top of page

                                                                                                  *कृष्णगाथा* 
*गीत २* 
          नाही कुणा अजुनही कृष्णलीला उमजली हेच खरं. योगी, ज्ञानी, सिद्धांती, वेदांती यांनाही या कृष्णलीलेचा अंतपार लागला नाही. पण "धरला हा पंढरीचा चोर प्रेमे बांधुनीया दोर" असा प्रेम दोर ज्यांच्या हाती होता त्यांनी मात्र या कृष्णलीलेच्या अंतरंगात जावून तिचा रसास्वाद घेतला. काय गंमत आहे बघा याच्या एकेक लीलेमुळे त्याचे वेगवेगळे नाव त्याला शोभून दिसले आणि ती नावे सुध्दा भवभयहारक,दुरीत निवारक, प्रेमप्रदायक अशीच झाली .उदराला दोर बांधून तो निरागस दामोदर होतो तर मुर राक्षसाचा वध केला म्हणून तो शासक मुरारी होतो आणि हेच नाव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे या महा-प्रेमघोषात शोभून दिसतं. कधी करंगळीवर गोवर्धन उचलतो म्हणून तो गिरीधर होतो. या गिरीधराला मीराबाईंनी प्रेमाने जिंकून घेतले म्हणून "मेरे तो गिरीधर गोपाल" असा स्थायी प्रेमभाव मिराबाईंचा झाला होता.
          या कृष्णानं निजलोकी गमन करायचं ठरवलं तेंव्हा तो आपल्या निजधामी कसा प्रवेश करतो ब्रम्हा, रुद्रादी देवता तीथे येतात व तेही त्या गतीला पाहू शकले नाहीत. "देवादयो ब्रम्हमुख्या न विशंतं स्वाधाम्नी" अशा भगवंताची व त्याच्या प्रेमभक्तांची पायधूळ सदा सर्वदा मिळत रहावी ही धारणा जेंव्हा जेंव्हा मानवी जीवनातून लोपते तेंव्हाच पाप प्रवृत्तीचा भार वाढून धर्म, नीती, संत या सर्वांच्या आधारानं,उपदेशानं घडणारा दिव्य जीवनबोध या पाप प्रवृत्तीच्या आसुरी शक्तींनी पोखरला जातो. द्वापार युगात हीच भीषणता कंसाच्या रूपाने थैमान घालीत होती. प्रजा, ऋषी, मुनी, साधु या सर्वांचे जिने कठीण होत होते. तेंव्हा ब्रम्हदेव, शंकर, स्वर्गातील अन्य देवता क्षीरसागरी जावून पुरुषसुक्ताने श्रीहरीची स्तुती करू लागले. त्यावर प्रसन्न होवून श्रीहरी म्हणतात
"ठावूक आहे पुरता मजला भूमीवरचा भार । 
लवकर आता मीच घेईल गोकुळी अवतार ।।"
आश्वासन दिल्याप्रमाणे भगवान श्रीहरींनी देवकीच्या गर्भात प्रवेश केला आणि मग त्रैलोक्यातून एक नाद घुमला "भारं भुवोहर यदुत्तम वंदनं ते" श्रीहरी पृथ्वीचा भार हरण करा आम्ही आपणास वंदन करतो.
          शाश्वत धर्मगोप्ता भगवंत केंव्हा प्रगटतो याची उत्सुकता सर्वत्र पसरली होती, त्या उत्सुकतेची परिसीमा झाली. अवतरणाची शुभवेळ सुखाच्या पावलांनी जवळ येत होती. समस्त शुभ गुणांनी संपन्न असा शुभसमय आला, रोहिणी नक्षत्र होतं, आकाशातील नक्षत्रे, ग्रह, तारे शांत व सौम्य झाले होते. दिशा स्वच्छ व प्रसन्न झाल्या होत्या, पृथ्वीवर मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं, नद्यांचे पाणी निर्मल झालं होतं. रात्र असूनही सरोवरात कमळे फुलली होती. कंसाच्या अत्याचाराने विझलेला अग्निहोत्राचा अग्नी आपोआप प्रज्वलित झाला आणि त्याच वेळी स्वर्गातील दुदुंभी वाजू लागल्या. आकाशातून पुष्पवृष्टी होवू लागली आणि विश्वातील पापप्रवृत्तीचा अंध:कार नाहीसा करून माधुर्य-भक्तीचं दान उधळण्यासाठीच 

"श्रावणाचा मास होता 
मध्य रात्र वेळ होती ।
अष्टमी येता तिथी
भुवरी ये श्रीपती ।।"

*******************************

श्रावणाचा मास होता 
मध्य रात्र वेळ होती ।
अष्टमी येता तिथी
भुवरी ये श्रीपती ।।१।।

श्रावणाच्या दाटल्या त्या
चहुदिशी जलसरी ।
पावसाने चिंब होई
सारी ती मथुरापुरी ।
नवल होई त्या क्षणी
देवकीला पुत्र प्राप्ती ।।२।।

नाही प्रसव वेदना
होई विस्मित देवकी ।
पाहवेना बालरूपा
पाहवेना दिव्य झाकी ।
शंखचक्र भूषणे ही
शोभती ती चार हाती ।।३।।

शब्द येता कानावरी
तनय मीच आठवा ।
नंद आणि देवकीला
लाभला जणु गारवा ।
लोपुनी ते तेज सारे
होती शिशुता हासती ।।४। 


*गीत ३* 
          भगवान श्रीहरी देवकी वसुदेवाचे समोर प्रथम प्रगटले ते मात्र दिव्य अशा चतुर्भुज रूपात. चारही हातात शंख, चक्र, गदा व पद्म.कोटी सुर्याप्रमाणे तेजस्वी असा डोईवरचा मुकूट. त्या तेजाने आणि श्रीहरीच्या अंगकांतीने कंसाची बंदीशाळा तेजोमय झाली. आपल्या पुत्राच्या रूपात साक्षात भगवंत प्रगटले आहेत हे पाहून देवकी वसुदेव चकितच झाले. हा तेजोनिधी आपला मुलगा "कंस शक्य आहे" नानाविध विचार तरंग उभयतांच्या मनी उठत असतांनाच भगवंताचे ते दिव्य रूप देवकीस म्हणतं -

"आठवतो का पूर्व जन्म तो सांग मज जननी"

*****************************

आठवतो का पूर्व जन्म तो 
सांग मज जननी ।
तेजोनिधी तो बोलू लागला 
मधुरा बोलांनी ।।धृ।।

होवू नको तू चिंतित येथे
भय कंसाचे नकोच माते ।
पूर्ण झाली आज तुमची
पूर्व कर्म देणी ।।१।।

स्वायंभूव होते मन्वंतर
होता तुमचा आश्रम सुंदर ।
सुतपा जाया तूच होतीस
नाव तुझे पृष्णी ।।२।।

भुलूनी तुमच्या तप प्रभावा
तथास्तु वादलो त्रिवार तेंव्हा ।
होईन प्रेमे पुत्र तुमचा
आठव ते तू मनी ।।३। 

पृष्णीगर्भ मी पहिला झालो
जन्म दुसरा वामन झालो ।
तोच आज मी उभा इथे
ठेव खूण मनी ।।४।।

 

 

*गीत ४* 
          स्वायंभुव मन्वंतरात देवकी पृष्णी व वसुदेव सुतपा नावाचे प्रजापती होते. पुत्र प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या चालली होती या दोघांची आणि त्यांच्या या तपस्येने प्रसन्न श्रीहरींनी वर मागा असे सांगितले. तुमच्याच सारखा पुत्र व्हावा हे मागणे देवकीने तीन वेळा मागितले. भगवंतांनी सुध्दा तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला. त्या वरदानाची आठवन ठेवूनच भगवंत देवकीच्या उदरी आले. आपले मुळ अलौकिक स्वरूप प्रथम प्रगट करून बघता बघता योगमायेने नवजात शिशुरुप धारण केले. ट्याहा ट्याहा..... असा रुदनाचा कोमल स्वर त्या बंदिशाळेत घुमला. भगवंताच्या योगमायेने मोहित झालेल्या देवकीने त्या बाळाला पोटाशी घट्ट धरून ठेवलं. या बाळाला कंस ठार मारणार तर नाही.देवकी वसुदेव थर थर कापू लागले आणि त्याच क्षणी आकाशवानी झाली "घाबरू नकोस वसुदेवा, या बाळाला त्वरीत गोकुळात नंदाच्या घरी ने. नंद पत्नी यशोदेच्या पुढे या बाळाला ठेव आणि माझ्या आज्ञेने तिच्या उदरी जन्म घेतलेल्या योगमायेला येथे घेवून ये" वसुदेवानं लगेचच आपल्या बाळाला उचलून हाती घेतलं. बंदिशाळेच्या दरवाजाजवळ येताच सर्व कड्या कुलपे गळून पडली. अहो, भगवंत हाती आल्यावर बंधन राहणार कशी. यमुना तीरी वसुदेव आले आणि पाहतात तर काय रुद्ररूप धारण करून बेफाम वेगाने धावणारी,वाहणारी यमुना पाहून वसुदेव क्षणभर विचारात पडले. दिवस उजाडायच्या आत गोकुळात परत यायचं आहे हे ध्यानी घेवून वसुदेवानं यमुनेच्या प्रवाहात पाउल टाकलं आणि छोट्या बाळाला पोटाशी घट्ट धरून वसुदेव यमुनेला म्हणतात

"वाट देई यमुने मजला जातो पैल तिरी"

***************************

वाट देई यमुने मजला 
जातो पैलतीरी ।
बाळ इवला ठेवून येईन
तसाच माघारी ।।धृ।।

सात अपत्ये मजला झाली
नाही कुणीही अंकि खेळली ।
काही कळेना कसली उधारी
फेडायाची सारी ।।१।।

अंश आठवा हाच उरला
म्हणून झाला मोद मनाला ।
परी ठेवणे आले नशिबी
जीव इवला हा दुरी ।।२। 

आज्ञा प्रभूची आहे मला
न्यावे गोकुळी या बाळाला ।
म्हणून आलो तसाच वेगे
जातो नंदा घरी ।।३।।

देई मजला वाट सुखाने
जाईन आता तुझ्या साक्षीने ।
प्राण ठेवूनी प्राणाविण गं
येईन माघारी ।।४।।

 

 

 

 *गीत - ५* 
          प्रेमविव्हळ यमुनेने पैलतीरी जाण्यास आपला प्रवाह दुभंगून वसुदेवाला वाट करून दिली. वसुदेवांच्या प्रार्थनेने यमुनेचे चित्त सुखाने बहरलं. कृष्णलिलेचा सोहळा गोकुळी रंगण्यासाठी कृष्णकार्याचा श्रीगणेशा यमुनेनं केला. माझे अथांग जल पाहून कृष्ण असा तर विचार करणार नाही ना की या अथांग पाण्यात मी पुढे जलक्रीडा कशी करू. यमुनेच्या मनातील भाव जाणून कृष्णाने आपला एक पाय हळुवारपणे बाहेर काढून अंगठ्याने यमुनेला स्पर्श केला. तोच तिचे पाणी कुठे कंठापर्यंत तर कुठे नाभीपर्यंत तर कुठे गुडघ्यापर्यंत होत गेले. कृष्णपद स्पर्शाने पुलकित, तृप्त झालेली यमुना वासुदेवांना म्हणते-

"जा सुखाने वसुदेवा आता"

*****************************

जा सुखाने वसुदेवा आता
सुखवून माझ्या चित्ता ।।धृ।।

दिसे जरी हे अथांग पाणी 
थांबू नको रे जाई तत्क्षणी ।
वाट देईन मी अनंता ।।१।।

हाती तुझिया नाथ जगाचा
ठेवा जणू हा सर्व सुखाचा ।
कशास मनी ती चिंता ।।२।।

हरिसवे तू इथून जावे
हेच माझे भाग्य म्हणावे ।
न कळे विधीलिखिता ।।३।।

कसे करू मी स्वागत न कळे
अबोल माझे भाव सगळे ।
तृप्त मी  भानूदुहिता ।।४।।

 

 

 *गीत ६* 
          यमुना पार करुन वसुदेव गोकुळात आले आणि आपल्या पुत्राला यशोदेच्या पुढ्यात ठेवून यशोदेच्या कन्येला हाती घेवून वसुदेव परत मथुरेत आले. त्यांच्या या कार्याचा कोणालाच मागमूस लावला नाही. कारागृहात आल्यावर मात्र त्या कन्येने रडण्यास सुरुवात केली. त्या पोरीचा टाहो ऐकून पाहरेकऱ्यांचे धाबे दणाणले आणि पळतच जावून त्यांनी कंसाला ही वार्ता सांगितली, रज, तम या गुणांची जागृती मायेच्या आवाजानेच होते आणि त्यांची धावही कंसाकडे म्हणजे अधार्मिकतेकडेच राहते. कंस सुध्दा आपला प्राणवैरी जन्माला आला म्हणून धडपडत धावत बंदिशाळेत आला. देवकी समोरचं अपत्य पुत्र आहे की कन्या हे न पाहताच कंसाने तिला हाती धरून उचलले, तिला शिळेवर आपटणार तोच ती त्याचे हातातून निसटून आकाशात विजेप्रमाणे तळपू लागली. अष्टभुजा जगदंबेच्या रूपात ती योगमाया कंसाला गर्जून सांगते

"मरणार ना मी भोजराया"

*******************************

मरणार ना मी भोजराया
मीच अनादि योगमाया ।।

अता थांबवी बालक हत्या
अर्थ नसे रे तुझीया कृत्या ।
दुस्तर आहे श्रीहरी माया ।।१।।

विश्वरूपा मी विश्वचालका
मीच अंबिका मीच कालिका
शक्तीहीन तू मज माराया ।।२।।

वैरी तुझा रे सुखात आहे
जगताचा तो पालक आहे ।
मर्त्य तू तव नश्वर काया ।।३। 

पूर्ण भरुनी गेले कधीचे
(पूर्ण भरले आहे कधीचे)
घडे हजारो तव पापांचे ।
क्षणी जाईल धुंदी विलया ।।४। 


*गीत ७* 
          कृष्णलीलेतील एक महत्वाचा धागा योगमायेकडून कृष्णाने विणून घेतला. कृष्णानी तिला वरदान दिलं की, तू सर्वांना इच्छित देण्यास समर्थ होशील. पृथ्वीवरती दुर्गा, महाकाली,विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका या नावांनी सर्व तुझी स्तुती करतील. नंदाच्या घरी पाळणा हालावा ही साऱ्या गोकुळाची ईच्छा होती. यशोदेला मुलगा झाला ही वार्ता सर्व व्रजवासियांना इतकी सुखदायी होती की,जो तो नंदाघरी धावत सुटला. धावता धावता आनंदाने मस्त होवून सर्वजण परस्परांचे अंगावर दही, दूध, लोणी, तूप उडवून आनंदोत्सव साजरा करू लागले. श्रोतेहो मला वाटतं तुमच्या मुखावरही ते लोण्याचे शिंतोडे उडले असतील, हात लावून बघाना गालाला. गोकुळात सर्वत्र आनंदच, प्रेमाचा तो महापूर नंदाघरी जन्मलेल्या कृष्णरूपी महाप्रेमसागरात सामावण्यासाठी नंदाच्या दारी आलेला आहे असा वाटावा आणि त्या प्रेमसागराच्या लाटातूनच त्रैलोक्याला सुखावणारा नाद घुमला

"आला नंदाघरी नंदलाला"

**************************

आला नंदाघरी नंदलाला 
साऱ्या गोकुळी आनंद झाला ।।धृ।।

दही,दुधाचे सडे शोभले
गोकुळ सारे नाचू लागले ।
दाही दिशात बोल घुमला
सोन्यालाहो सुगंध आला।
सोन्यालाहो सुगंध आला।।१।।

बाळ सावळे रूप देखणे
पाहुनी होती तृप्त लोचने ।
आनंदाने नंद बोलला
जन्म अवघा पावन झाला ।।२।।

बाळ इवला शाम सावळा
पाहि यशोदा वेळोवेळा ।
मोक्ष सुखाला वात्सल्याचा
अंकुर चिन्मय आला ।।३।।

शुभ वार्ता ती येता श्रवणी
तृप्त झाल्या गोकुळ रमणी ।
वेगे येती नंद घराला
बघण्या इवला नंदलाला ।।४।।


*गीत ८* 
          गोकुळात सर्वजण या नवजात बालकाचे मंगल चिंतीत होते तर मथुरेत कंसाच्या राजवाड्यात चिंतेचे चिंतन. आपला वैरी जीवंत आहे या विचाराने मदांध कंसाला खाणे पिणे सुचत नव्हते. वैरी कसा नष्ट करावा याचा रात्रंदिन विचार, त्यातच भर पडत होती कंसाच्या मंत्र्यांची व त्यांच्या आसुरी सल्ल्यांची . दहा दिवसांपूर्वी जन्म घेतलेल्या सर्व बालकांना ठार मारावे ही मंत्र्यांची यंत्रणा त्याच्या कानी मनी घुमू लागली. दहा दिवसांपूर्वी जन्म घेतलेल्या सर्व बालकांना ठार मारा ही कंसाची आज्ञा त्याच्या राज्यात थैमान घालू लागली आणि ते थैमान गोकुळातही शिरले. पुतनेच्या रूपात बालहत्या नंदाच्या वाड्यात आली. रूप होतं एका सुंदर स्त्रीच, जणू दुसरी लक्ष्मीच. आपल्या पुत्राला पाहायला साक्षात लक्ष्मीच आली आहे असे समजून यशोदा आणि रोहिणी यांनी तीचं स्वागत केलं. आपल्या तान्ह्या बाळकृष्णाला जेंव्हा यशोदेने पुतनेच्या हाती दिलं तेंव्हा दाही दिशा कासावीस झाल्या, त्यांची ती कातरता यशोदेस सांगत होती

"सुंदरतेचा वेष घेवून भीषणता आली"

*******************************

सुंदरतेचा वेष घेवूनी
भीषणता आली ।
सखे यशोदे सावध
छाया काळाची ग आली ।।

जन्मा आला ईश्वर ऐकुनी 
थरथरले असूर भीतीनी ।
कृत्या पाठविली ।।१।।

रूप दिसे वत्सलतेचे
रंग अंतरी घोर सुडाचे ।
पुतना ही आली ।।२।।

नसे कुणी ही कुलीन कामिनी
नसे कुणी ही भाग्य शालिनी ।
पापाची सावली ।।३।।

स्वभाव असतो या दृष्टांचा
वृक्ष छेदणे धर्म नीतीचा ।
कुटील ही खेळी ।।४। 

 

 

 *गीत ९* 
          पुतनेचे स्थनपाण करता करता कृष्णाने तिच्या प्राणाचेही पान केले. तेंव्हा आपलं खरं भयंकर स्वरूप प्रगट करून पुतना गतप्राण होवून जमिनीवर कोसळली आणि छोटा बाळकृष्ण तिच्या छातीवर निर्भयपणे खेळत होता. पुतनेच्या ह्या उद्धारामागे प्रार्थनेचे रहस्य दडलेले आहे. ते असे - भगवंताला मनोमन केलेली प्रार्थना भगवंताने मनानेच तिला दिलेले अनुमोदन यांनीही ती इच्छा पूर्ण होत असते. आपली मनोमन प्रार्थना भगवंताने ऐकली की नाही किंवा त्यावर भगवंत प्रत्यक्ष शब्दांनी तथास्तू म्हणाले नाही तर ती प्रार्थना निष्फळ होते असे कधीच समजू नये.भगवंतांनी वामनरूप धारण करून जेंव्हा बळीराजाच्या राजसभेत प्रवेश केला तेंव्हा बळीराजाची कन्या रत्नमाला ते वामनरूप पाहून मोहित झाली, देहभान विसरली तिच्या अंतरी मातृभाव निर्माण झाला आणि तिने मनोमनच म्हंटले की असा मुलगा मलाही असता तर मीही तिला स्तनपान दिले असते. वामनाने मनोमन तिला अनुमोदन दिले आणि हीच रत्नमाला द्वापार युगात पुतना झाली आणि कृष्णस्पर्शाने तिची लालसा पूर्ण झाली.
          कालांतराने वसुदेवास इच्छा झाली की,आपल्या कुलाचार्याच्या गर्गाचार्याच्या हातून आपल्या मुलाचा नामकरण विधी संपन्न व्हावा म्हणून त्यांना वसुदेवाने गोकुळात पाठवलं. गर्गाचार्य आलेले पाहताच नंदासहित सर्व गोकुळवासीयांना आनंद झाला. आपल्या पुत्राला कृष्णाला मोठया प्रेमानं यशोदेनं गर्गाचार्याच्या हाती दिलं. ज्याच्या प्राप्तीसाठी हजारो वर्षांची तपश्चर्या जिथे पुरी पडत नाही तेच पूर्ण ब्रम्ह प्रत्यक्ष पाहताच गर्गाचार्य समाधी सुखात रंगून गेले. गर्गाचार्यानी यशोदेच्या मुलाचं नाव "कृष्ण" आणि रोहिणीच्या मुलाचं नाव ठेवलं "बलराम".दिवसांचा हात धरून कृष्णाचं वय वाढत होतं. हळू हळू कृष्ण रांगू  लागला बाळकृष्णाची प्रत्येक बाळलीला गोपीना सुखाचीच वाटायची. कृष्णाला रांगतांना पाहुण त्या गोपिंची,यशोदेची, रोहिणीची अवस्था अवर्णनीयच होती. बाळकृष्ण रांगायला लागला हे सांगण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणूनच -

"जो तो सांगे ज्याला त्याला
बाळकृष्ण हा रांगु लागला"

****************************

जो तो सांगे ज्याला त्याला
बाळकृष्ण हा रांगु लागला ।।धृ।।

गोकुळ अवघे झाले वेडे
ध्यानी मनी ते कृष्ण रुपडे ।
दुड दुड धावे हरी सानुला ।।१।।

हाती जयाच्या विश्वदोरी
तोच रांगतो नंदमंदिरी ।
काही सुचेना काम कुणाला ।।२।।

एक पाळणा नंदसदनी 
हाले दुसरा गोपी नयनी ।
अदी अंत ना या प्रेमाला ।।३।।

गोकुळ येवूनी कृष्णापाशी
हृदयी प्रेमे लावून त्यासी ।
घेती चुंबन वेळोवेळां ।।४।।


*गीत १०* 
          वाढत्या वयाबरोबर रामकृष्णाच्या खोड्याही वाढत होत्या. रोजची गाऱ्हाणी ऐकून यशोदा मेटाकुटीला आली होती. एकदा कृष्णाचे सर्व मित्र घरीच आलेले पाहताच यशोदा समजली की आज कृष्णानं काहीतरी अनर्थ केला आहे. सर्व गोप सांगू लागले "माई आज या कृष्णानं माती खाल्ली" त्या मुलांची कागाळी ऐकून यशोदेचा क्रोध अनावर झाला. एका हाताने धरून तिने त्याला मारण्यासाठी हात वर उगारला. ते पाहताच बोबड्या गोड बोलात कृष्ण म्हणतो -

"नाही खाल्ली खरच गं माती"

*****************************

नाही खाल्ली खरच गं माती
आई नाही खाल्ली माती ।।धृ।।

लबाड आहे गोप सगळे
ठावूक आहे तुला वत्सले ।
चुगली उगा करिती ।।१।।

दुध लोणी आपुल्या घरचे
खाता नूरते नांव भुकेचे ।
कशास खाउ मी माती ।।२।।

व्रजराणी तू माझी जननी
तनय तुझा मी असे बहुगुणी ।
कशास खोडी भलती ।।३।।

पाही माझे तोंड निरखून 
आत नाहीच माती कण ।
भुवने चौदा नांदती ।।४।।


*गीत ११* 
          आपल्या मुलाच्या मुखात अखिल ब्रह्मांड पाहणारी यशोदा तत्क्षणीच ब्रम्हभावात रंगून गेली. आपली माता ब्रम्हभावात राहिली तर आपण मातृसुखाला व आपली आई पुत्रसुखाला अंतरेल म्हणून कृष्णानं आपली योगमाया यशोदेवर पांघरून तिला देहभानावर आणलं.  आता आणखी कोणती गाऱ्हाणी ऐकायला येवू नये म्हणून यशोदेनं कृष्णाला उखळाला बांधून ठेवलं आणि आपल्या घरकामात दंग झाली. भूत, भविष्य, वर्तमान यांचा स्वामी कृष्ण भक्तश्रेष्ठ नारदाचं वाचन सत्य करण्यासाठी उखळासगट रांगत रांगत अंगणात आला. अंगणात असलेल्या दोन अर्जुन वृक्षाचे मधून जावू लागताच ते दोन्ही वृक्ष उन्मळून जमिनीवर कोसळले. नारदाच्या शापाने वृक्षयोनी प्राप्त झालेले कुबेर पुत्र मणिग्रीव व नलकुबेर यांचा उद्धार झाला ते दोघेही कृष्णाचे पाया पडून क्षमा मागू लागले.

"सुत धनदाचे मुक्त झालो,
मुकुंदा शरण तुला आलो"

**************************

सुत धनदाचे मुक्त झालो ।
मुकुंदा शरण तुला आलो ।।धृ।।

सत्ता मदिरा आणि यौवन
यात रंगले होते जीवन ।
कसे नकळे मूढ जाहलो ।।१।।

अमोघ होती शापवाणी
म्हणून झालो वृक्ष तत्क्षणी ।
तुझ्या कृपेने पावन झालो ।।२।।

पुन्हा न व्हावा दोष यापरी 
हीच प्रार्थना तुला मुरारी ।
नाथा अलकापुरी चाललो ।।३।।

धन्य झाली अमुची काया
आज पाहिले तुझिया पाया ।
प्रेमे नतमस्तक रे झालो ।।४।।


*गीत  १२* 
          वृक्ष कोसळून पडल्याचा आवाज ऐकताच सर्वजण नंदवाड्यातून बाहेर आले. दोन वृक्षाच्या मध्ये कृष्णाला सुखरूप पाहून गोकुळवासियांचा जीव भांड्यात पडला. गोकुळात वारंवार येणारे उत्पात,छोट्या कृष्णावर येणारी ही संकटे यातून सर्वच जण सुखरूप राहावे म्हणून सर्व गोपांच्या सल्ल्याप्रमाणे गोकुळ सोडण्याचं नंदानं ठरवलं आणि सर्वच जण वृंदावनात राहायला आले.पूर्वीप्रमाणेच कृष्णाचे खेळ व खोड्या सुरूच. वृंदावनात आल्यावर कृष्णाला व त्याच्या गोप गड्यांना रानात गायी घेवून जाण्यास परवानगी मिळाली. सकाळीच गायींना घेवून जायचं आणि दिवस मावळता परत यायचं. पण येवढाही विरह गोपींना सहन होत नव्हता. मावळतीला हंबरणं व घुंगराचा आवाज ऐकताच अधीर गोपी एकमेकांना म्हणत -

"वाजू लागल्या घुंगुरमाळा
चला सख्यांनो चला "

****************************

वाजू लागल्या घुंगुरमाळा
चला सख्यांनो चला।
गाई गुरांच्या संगे येईल
हरी गोपाळांचा मेळा ।।धृ।।

ओढ घराची लेवून अंगी
येईल कान्हा पुढती ।
गोधुळीचा गुलाल धुसर
असेल अंगावरती ।
चला चला ग लावू या तो
गुलाल आपुल्या भाळा ।।१।।

चित्तचोर तो कान्हा सुंदर
सर्वाआधी पाहू चला ।
असेल हाती मुरली त्याच्या 
गळ्यात त्या वनमाला ।
सुंदर त्याचे रूप सावळे
देवू आलिंगन त्याला ।।२।।

त्या रुपाला कसली उपमा
स्वर्गी भूवर पाताळी ।
लीला गाता अपुऱ्या पडती
शब्दांच्या ग ओंजळी ।
नयनी हृदयी धरून ठेवू
श्यामल मुरलीवाला ।।३।।

 


*गीत 13* 
          रानात आणि घरी आल्यावरही कृष्णाच्या खोडयांना उत यायचा. रानात जाता जाता गोपींची खोडी, तर खडा मारून गोपींचा माथ्यावरचा ताकाचा माठ फोडायचा आणि त्या गोपींचा ताकाने माखलेला चेहरा पाहून जोरजोराने हसायचं. रोज नविन नविन गाऱ्हाणे, त्रस्त होणारी यशोदा मग आपल्या पोराला विनवणी स्वरात म्हणायची -

"आवर आता चाळे पुरते ।
थकले बाळा हात जोडते "।।

*************************

आवर आता चाळे पुरते ।
थकले बाळा हात जोडते ।।धृ।।

तुझ्याच हाती लाज घराची 
किव येवू दे या मातेची ।
गाऱ्हाणे बघ रोजच येते ।।१।।

दुध लोणी घरात असता
रुचे कसे ना तुला अनंता ।
खेळ चोरीचे काय भलते ।।२।।

कसे सांगू मी या गोपीना 
पुन्हा पुन्हा रे येती सदना ।
नाही नाही ते ऐकून घेते ।।३।।

नाव राख रे नंद कुळाचे
तुला सांगते बघ शेवटचे ।
माय म्हणाया लाज वाटते ।।४।।

 

 *गीत १४* 
          "दूध लोणी घरात असता । कसे रुचे ना तुला अनंता ।।" असे जरी यशोदा त्या श्यामसुंदराला म्हणायची तरी पण घरी व दारी चोरून दूध,तूप, लोणी खाण्याच्या त्याच्या लीला कमी होत नव्हत्या. गोपींच्या मनात वात्सल्य भाव माधुर्य भक्तीचा प्रेमभाव वाढावा यासाठी कृष्णाच्या या माखनचोरीच्या लीला होत्या. कृष्णचिंतनातच गोपी रात्री दूध विरजण ठेवायच्या.  सकाळी त्याच दह्याला घुसळून त्यातील लोणी अशाच ठिकाणी ठेवायच्या की कृष्णाचा हात तिथे सहज पोहचावा. दही, दूध, लोणी खाणाऱ्या त्या कृष्णरूपाची मोहिनी आगळीच. एकदा कृष्ण यशोदेला सांगत होता, आई मला तू रोज म्हणते मेवा पक्वान्न खा पण मला ते मुळीच आवडत नाही. मला लोणीच आवडतं. एका गोपीने दाराआडून कृष्णाचं हे बोलणं ऐकलं, मनातल्या मनात ती गोपी म्हणते हा कृष्ण माझ्या घरी कधी बरं येईल लोणी खायला. त्याचं ते चोरून लोणी खातांनाचं रूप मी दाराच्या आडून कधी बरं पाहिन.  त्या गोपीची ती इच्छा जाणून दुसरे दिवशी कृष्ण त्या गोपीच्याच घरी गेला. लोणी खाणाऱ्या कृष्णाचे रूप पाहून ती गोपी आनंदाने इतकी बहरून गेली की, त्याचे वर्णनच करता येत नाही. फुली फिरती ग्वाली मनमे री । पुछती सखी परस्पर बातै । पायो परायो कछु कहू तै री । पुलकित रोम रोम गदगद मुखबानी । कहत ना आवै । ऐसा कहा आई सो सखी री, हमको क्यु सुनावै । तन न्यारा जीय एक हमारौ हम तुम एकै रूप । सुरदास कहै ग्वाली सखीन सौ देखयो रूप अनुप ।।
           असं तिला इतर गोपी विचारतात तेंव्हा ती गोपी एव्हढच म्हणते आज मी अनुपम रूप पाहिलं. बस्स आणि ती गोपी गप्प झाली. यमुनेवर पाण्याला जाणाऱ्या गोपींची अगदी केविलवाणी अवस्था व्हायची त्यातही त्यांना एक अबोध,निर्मल आनंद मिळायचा. ध्यानी, मनी, नयनी, वाणीत गोपालाचच नाव व त्यांचं गुणगान. एखादया गोपीला कुणी म्हणावं बाई आज तू एकटीच जा ना पाण्याला तर ती गोपी प्रेमविव्हळ होवून म्हणायची

"वाट रोखुनी उभा अंगणी ।
यशोदेचा कान्हा ग सावळा ।।"

***************************

वाट रोखुनी उभा अंगणी ।
यशोदेचा कान्हा ग सावळा ।
अता येथूनी घडा घेउनी
कसे बाई जायचे पाण्याला ।।धृ।।

कांती सावळी दिव्य झळाळी
डोईवरती मुकुट शोभला ।
नंदलाल घेउनी मुरली
दारापाशी उभा राहिला ।।१।।

पायी पैंजण मूर्ती देखणी
भूल बाई पडे मनाला ।
त्याला पाहून पडे मोहिनी
घडा ना राही तो कमरेला ।।२।।

डोळ्यापुढती सदा दिसे तो 
डोळे मिटता मनी हासतो ।
वाट मोकळी नाही कोणती
ठायी ठायी हा नंदलाला ।।३। 


*गीत १५* 
        गोपींच्या व गोपांच्या गाऱ्हाण्यात द्वेष नव्हता, होतं फक्त कृष्णप्रेम, प्रेमाधीनता होती. त्या गाऱ्हाण्यात यमुनेवर जातांना कृष्ण वाट तर अडवणार नाही हा सुखस्पर्श असायचा, तर कधी कधी आकाशात दाटून येणाऱ्या श्यामल मेघांना पाहून गोपींची वृत्ती आणखीनच चंचल व प्रेमविव्हळ व्हायची त्या सावळया मेघातही त्यांना तो सावळा श्यामसुंदर दिसायचा आणि मग त्या भोळ्या भाबड्या गोपी मेघांना म्हणायच्या

"नकोस येवू श्यामल मेघा
पुन्हा पुन्हा रे गगनी"

***************************

नकोस येवू श्यामल मेघा
पुन्हा पुन्हा रे गगनी ।
तुला पाहुनी दिसू लागतो
मुकुंद माधव मनी ।।धृ।।

दूर जरी ही काया फिरते
यमुनाकाठी मन ते जाते ।
गोपीनाथ तो नाचू लागतो
पुन्हा पुन्हा रे नयनी ।।१।।

दावू नको रे रंग सावळा
भूल पडते उगा मनाला ।
ध्यानी मनी ती हसू लागते
कृष्णरूप मोहिनी ।।२।।

तुला पाहता हरी सावळा
रोमरोमी व्यापून गेला ।
बघता बघता मनी रंगती
नकळत श्यामल गाणी ।।३।।


*गीत १६* 
          भक्तीसुखाच्या लीला यामुनेकाठी रंगत असतांनाच काही अघटीत घडून जायचे. यमुनेच्या डोहात एक भयानक दाहकता कालियाच्या रूपाने वावरत होती. आपल्या अहंकारी बळावर विषारी फुत्कारांनी व गरळाग्नीच्या दाहकतेने यमुनेचे पाणी व वातावरण कालियाने विषमय करून टाकले होते. सर्प व नाग हे गरुडाचे भक्ष,पण गरुडाला एक शाप होता ती घटना अशी - नागांचे स्थान हे रमणकद्वीप होते. तेथे गरुड व कालिया यांची जोरदार झटापट झाली. गरुडाच्या चोचीने, नखांनी,पंखांनी कालिया विव्हळ झाला आणि तो यमुनेच्या खोल डोहात सहपरिवार येवून राहिला. याच यमुनेच्या तीरावर तपस्वी सौभरी आराधनेस बसले आसतांनाच एका मत्स्य राजाला गरुडाने पकडून गिळंकृत केले.  हे पाहून इतर मासे तडफडू लागले तेंव्हा त्या सौभरीने गरुडाला शाप दिला, यापुढे तू या ठिकाणी मत्स्य भक्षणास आलाच तर तू तात्काळ मृत्यू पावशील. या शापाची माहिती केवळ कालियालाच होती. म्हणून गरुडापासून प्राण वाचावे या हेतूने कालिया रमणकद्वीपातून यमुनेच्या डोहात येवून राहिला होता. एक दिवस हे विषारी पाणी गायी, गुरे आणि कृष्णाचे सवंगडी यांनी प्राशन केल्यावर सर्व गतप्राण, सर्वत्र हाहाकार. सगळे वृंदावन यमुनेकडे धावत सुटले. कृष्णाला तो अंकात पाहवला नाही. कृष्णाने आपल्या अमृत दृष्टीने त्या सर्वांना जिवंत केले. त्याच वेळी बघता बघता कृष्णाचे मोहक बालरूप माध्यान्हीच्या सुर्याप्रमाणे प्रखर झाले. कालियाच्या वधाचा संकल्प मनी स्फुरला त्याच आवेशात कृष्ण कदंब वृक्षावर चढला. यमुनेचे उकळणारे विषमय पाणी पाहून त्या अथांग डोहात उडी मारली कारण - 

"नावरे क्रोध तो कृष्णाचा"

***************************

नावरे क्रोध तो कृष्णाचा
ऐकुनी आकांत सोयऱ्यांचा ।।

केला निश्चय मनात काही
उडी घातली अथांग डोही ।
क्षण शतमुखदमनाचा ।।१।।

हतबल झाला तो कालिया
शिथील गात्रे शिथील काया ।
श्वास लागला तो शेवटचा ।।२।।

शरण येवूनी गोविंदाला
म्हणे कालिया रक्षी मजला ।
निरोप घेतो या यामुनेचा ।।३।।

सुखी पाहुनी श्याम सुंदरा
जय नादाचे गंध अंबरा ।
सडा पसरला आनंदाचा ।।४।।


*गीत १७* 
         विषारी कालियास दंडित केल्यावर आपल्या फणांवर कृष्णाला घेवून कालिया जलातून वर आला. कृष्णास सुखरूप पाहून सारे आनंदाने नाचू लागले. कृष्णाला शरण येऊन क्षमा याचना केली कालियाने. कृष्णाने त्याला आज्ञा केली हे स्थान सोडून रमणकद्वीपात परत जा. माझ्या चरणाच्या स्पर्शाने तुझे मस्तक चिन्हीत झालेले आहे त्यामुळे तुला यापुढे गरुडापासून काहीही त्रास होणार नाही. कृष्णाच्या लीलांनी सारं गोकुळ, गोप, गोपी कृष्णमय. कात्यायनी व्रत करणाऱ्या कुमारी गोपींचा माधुर्यभाव वाढतच होता. कात्यायनी व्रताचा एक भाग म्हणजे नित्य यमुनेवर स्नान. अशाच एका पहाटेच गोपी आपापली वस्त्रे काठावर ठेवून यमुनेच्या पाण्यात स्नानासाठी शिरल्या. गोपींच्या माधुर्यभक्तीत देहबुद्धीचा अंश राहू नये म्हणून कृष्णाने एक लीला केली. गोपींची सारी वस्त्रे घेवून खट्याळ गोपाळ कदंब वृक्षावर चढून बसला. स्नान करून बाहेर यायला निघतात तर आपली वस्त्रे नाहीशी झालेली पाहून गोपी कावऱ्या बावऱ्या झाल्या. इकडे तिकडे पाहतात तर वस्त्रे कदंब वृक्षावर लटकत आहे आणि खट्याळ कृष्ण मिस्कीलपने हसतोय. कृष्णाला पाहताच साऱ्या गोपी पाण्यातच आकंठ बुडून कृष्णाला म्हणतात

"कुलवंताच्या आम्ही तनया"

******************************

कुलवंताच्या आम्ही तनया
देरे वस्त्रे अमुची मुकुंदा ।
शरण तुझ्या पाया ।।धृ।।

कळले आता गुन्हा जाहला
मन हे दिधले नाही तुजला ।
म्हणून का ही केलीस शिक्षा 
नकळे रे माया ।।१।।

चूक आमुची ती खरोखरी
प्रेमी गोपीका घेई पदरी ।
कुठवर राहू सांग या जळी
शहारते काया ।।२।।

नाही उरलो आम्ही आमच्या
तूच मालक गोपी तनुचा ।
जन्मोजन्मी देई मुकुंदा
तुझीच रे छाया ।।३।।

येतो आता बघ काठावर
देरे आमुची वस्त्रे सत्वर ।
उशीर भलता झाला कृष्णा
घराकडे जाया ।।४।।

 

गीत १८
          आपल्या भक्तांच्या ठायी शास्त्रविरुद्ध आचरणाचा कोणताच दोष राहू नये यासाठीच ही चिरहरण लीला होती. "न नग्न सायात" अंगावर वस्त्र न ठेवता जलप्रवाहात स्नान करू नये ही शास्त्राज्ञा आहे. कारण चराचराच्या प्रत्येक वस्तूत देवतांचे अस्तित्व मानले आहे. जलाची देवता वरून, त्याचा अपमान होवू नये म्हणून कृष्णाने चिरहरणाद्वारे गोपींना बाहेर काढलेले आहे. कात्यायनी व्रत करणाऱ्या गोपींना इच्छित दान देवून कृष्णाने त्यांना देहबुद्धीच्याही बंधनातून मुक्त केलं. त्याचप्रमाणे कृष्णचिंतनात सदैव रममाण होवून संसार करणाऱ्या ऋषी पत्नींनाही कृष्णानं अत्युच्च भक्तीसुख प्रदान केलं. एकदा गायींना घेवून रानात गेल्यावर न्याहारी केल्यानंतरही सर्व गोपबालकांना भूक लागली. भूक आवरेना तेंव्हा कृष्ण म्हणतो गड्यांनो येथून जवळच काही ऋषी यज्ञ करीत आहेत. त्यांच्या पत्नीपाशी जावून सांगा कृष्णाला व आम्हाला भूक लागली आहे. त्या तुम्हाला भरपूर अन्न देतील. कृष्णाच्या आज्ञेने सर्व गोपाल ऋषी पत्नींच्याकडे जावून कृष्णाचा निरोप सांगतात. कृष्णाचा निरोप ऐकताच सर्वांच्या सर्वांगातून कृष्णप्रीतीचा फुलोरा फुलला. कृष्ण दर्शनाची त्यांची उत्कंठा त्यांच्या डोळ्यात बोलकी होवून जणू बोलू लागली.

"लागली मनी अती उत्कंठा भेटाया"

*****************************

लागली मनी अती उत्कंठा भेटाया
गिरीधरा येई तू स्वये इथे भेटाया ।।

पाहण्या कोमला तुझीच श्यामल मूर्ती
ऐकण्या बासरी आतुरलो रे चित्ती ।
कुठवरी धरावा धीर आता थांबाया ।।१।।

अंतरी सतत ते स्मरण तुझे रे नाथा
तशीच वदनी तुझीच पावन गाथा ।
दवडीला कधी ना एकही क्षण वाया ।।२।।

जाणसी भाव काय असे रे मनीचा
धाडला म्हणून का निरोप तू भिक्षेचा ।
करू नको दयाळा उशीर भेटी द्याया ।।३।।

******************************

लागली मनी ती उत्कंठा भेटाया
गिरीधरा ये इथे भेटाया ।।

पाहण्या कोमला तुझीच ती मूर्ती
ऐकण्या बासरी आतुरता चित्ती ।
धरू कसा धीर रे थांबाया ।।१।।

अंतरी सतत स्मरण रे नाथा
तशीच वदनी तुझीच ती गाथा ।
दवडीला कधी ना क्षणही वाया ।।२।।

जाणसी भाव काय असे मनीचा
धाडला म्हणून का निरोप भिक्षेचा ।
करू नको उशीर भेट द्याया ।।३।।
 

 *गीत १९* 
          ऋषीपत्नींना स्वतःवर आवर घालता आला नाही. अनावर होवून हाती अन्नाची ताटे भरून भरून घेवून त्या धावतच सुटल्या. ऋषीपत्नींनी आणलेलं अन्न ग्रहण करून भगवान गोपाल त्या ऋषीपत्नींना म्हणतात - हे भाग्यवान सतींनो ! माझे दर्शनाची तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, आता सुखाने घरी परत जा, तुमचे पती यज्ञ कर्मात आहे, तुमच्याविना त्यांचे यज्ञकर्म अपूर्ण राहील, तुम्ही घरी जा. माझा वियोग होईल असे समजू नका. जेथे माझे स्मरण तेथे मी असतोच. कृष्णाचा हा उपदेश ऐकून मात्र त्या पत्नींचं मन थरथरलं. विरहाच्या भितीने काया शहारली, त्यांचा थरथरता भाव कृष्णाला सांगू लागला -

"सांगतोस का फिरा माघारी"

*****************************

सांगतोस का फिरा माघारी
तुला पाहुनी गुंतू कसे रे संसारी ।।धृ।।

शतजन्मीचे पुण्यच फळले
ध्यानी तुझिया चित्त जडले ।
जाऊ कसे रे परत घरी ।।१।।

तूच लाविली ओढ अनंता
तूच वेधले अमुच्या चित्ता ।
करू दे तुझीच रे चाकरी ।।२।।

क्षणभर तुजसी जुळता नाते
द्वैतभावना लोपून जाते ।
नाही आवडी घर संसारी ।।३।।

तुझ्याच चरणी होवून धुळी 
तुझ्यासंगती राहू गोकुळी ।
विरह नको रे क्षणभरी ।।४।।
 


*गीत २०* 
          गोपांना भूक लागल्याचे  निमित्य करून ऋषीपत्नींचा उद्धार केला आहे कृष्णानं. माझ्या नित्य स्मरणात माझा नित्य संयोग आहे हे भक्तीसूत्र त्या भाग्यवान ऋषीपत्नींना अर्पण करुन प्रपंचातच भगवंत पाहण्याचा, भक्तीसुख अनुभवण्याचा दृष्टिकोन कृष्णांनी त्यांना दिला. गृहस्थाश्रमाचे पावित्र्य कोणते हे दाखवून दिले. पण या भक्तीसुखाचे महत्व इंद्राला मात्र समजलेच नाही. देव दुसरीकडे कुठे पाहू नका तो आपल्यातच आहे. आपल्या उन्नत्तीचे स्वामी आपणच आहोत. आपली शुद्ध कर्मे हीच आपली देवपूजा. आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत गायी, गोवर्धन, यमुना, वृक्षलता, आत्मीय स्वजन बांधव, वृंदावन यांच्याबरोबर कृतज्ञतापूर्वक निस्वार्थ प्रेमभाव,सेवाभाव हीच उपासना हा नवा दृष्टिकोन कृष्णाकडून मिळाल्यावर व्रजवासीयांनी पारंपारिक अशी इंद्रपुजा बंद केली आणि कृष्णाच्या आज्ञेने गोवर्धनाची पूजा करण्यास सर्व सिद्ध झाले आणि पूजेची तयारी करून सर्वजण गोवर्धनाजवळ आले. आनंदाचे एक गीत साऱ्या व्रजवासीयांच्या ओठावर आले.

"देव हाच गिरी गोवर्धन
नको इंद्र पुजेचा डौल"

          आपल्या पूजेऐवजी गोवर्धनाची पूजा सुरू झालेली पाहुन इंद्राचा क्रोध अनावर झाला. अभिमानाने ओथंबलेल्या इंद्राने मेघांची सर्व बंधने काढून घेतली आणि आज्ञा केली व्रजभूमीवर वर्षाव करून व्रजमंडळ बुडवा. स्वर्ग सुख सत्तेचा मद, त्यातून क्रोध पण अशा मदांध सत्तेला तिच्या क्रोधाला रोखणारी शक्ती असते हे मात्र इंद्राला समजले नाही. प्रलयकारी सांवर्तक मेघांना इंद्र सांगतो-

"जा सांवर्तक मेघांनो जा"

********************************

जा सांवर्तक मेघांनो जा
बुडवा साऱ्या व्रजभूमीला ।।धृ।।

भय नाही हो तुम्हा कुणाचे
पालन करता मम आज्ञेचे ।
जलधारांना खुशाल उधळा ।।१।।

बालक इवला हा नंदाचा
उगाच होतो गौरव याचा ।
दंडाविण हा मार्ग न उरला ।।२।।

परंपरा ही मम् पूजेची
जावू न देई अशी हातची ।
अपमानाचा घेतो बदला ।।३।।

जलमय होता सारे गोकुळ
भीतीने ते होई व्याकुळ ।
येतील सारे शरण मला ।।४।।


*गीत २२* 

        अहंकार तर फारच घातक, परमार्थ असो वा प्रपंच असो अहंकारानेच दुःखाचे दान पदरी पडते. रासलीला खेळतांना आमच्या सारख्या भाग्यवान स्त्रिया त्रैलोक्यात नाही, कृष्ण सर्वस्वी आमचाच आहे या अहं चा स्पर्श गोपींना होताच कृष्ण एकदम गुप्त, मग मात्र साऱ्या गोपी बावरल्या, घाबरल्या, वेड्यापिश्या झाल्या आणि केविलवाण्या स्वरात त्यांचा तो विरहभाव त्यांच्या मुखातून बाहेर आला - 

"लागला प्राणास रे वणवा
ये सावळ्या मनमोहना"

          भगवान मनमोहन बाळकृष्ण आपल्या असंख्य प्रेमलीलांनी, बाललीलांनी, व्रजवासियांच्या अंतरी, भक्तांच्या अंतरी बोधांमृताचे सिंचन करत होते. सारे सारे तृप्त तृप्त होत होते. जीवनाचा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, भक्तीचा सोहळा कसा वाढवावा, याचे सहज शिक्षण गोपाळाच्या प्रेमलिलातून सर्वांना मिळत होते. कधी प्रेमरस, कधी भक्तिरस, कधी सुखाचा रस तर कधी रौद्र रसातूनही ही दैवी शिकवण सर्वांना मुक्त हस्तानं देत होता हा नटखट गोपाळ. साम, दाम, दंड, भेद, निती या सर्वांचा वापर संकटाच्या नाशासाठी अगदी चतुराईने हळुवारपणे करून व्रजभूषण, नंदनंदन सर्वांच्या अंतरी भरून राहिला होता.
          शकट, तृनावर्त, व्योमासूर, बकासूर, अघासूर, केशी, धेनूकासूर अशी कितीक नावे सांगावी दैत्यांची. या सर्व दैत्यांचा संहार करून व्रजवासियांना निर्भयतेचे दान देण्यात अग्रेसर असा हा जगतनियंता आपले देवपण विसरून गोपलकाला करतांना, गोपलकाला खातांना बरोबरीच्या सवंगड्याचा सखा होत होता. स्वतःच्या लिलांचा पार ब्रम्हदेवालाही न कळू देणारा, त्याला नतमस्तक करणारा हा यशोदानंदन.
          वृंदावनाचा दुःख भार असा हलका करत असतांनाच व परमप्रेमाचा असा वर्षाव करत असतांनाच कृष्णाच्या अवतार कार्याचा एक महत्वाचा टप्पा जवळ आला तो म्हणजे कंस वध. धनुर्यागाच्या निमित्ताने कंसाने आपल्या मृत्यूलाच जणू आमंत्रित केले होते. कंसाच्या आज्ञेने कृष्ण व बळराम यांना मथुरेला नेण्यास अक्रुर गोकुळात आले. कृष्ण मथुरेला जाणार हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले वृंदावनात. कृष्ण विरहाच्या कल्पनेनेच सर्वांचे जीव कासावीस झाले. गोपींनी तर अक्रुराला गराडाच घातला. पापण्यांच्या उघडझापी होतानाचा विरहही जिथे त्या गोपींना कासाविस करत होता तर आताचा हा विरह ....... छे छे ..... शक्यच नाही व दरडावणीच्या प्रेमळ स्वरात अक्रुरास त्या म्हणतात -

 नेऊ नकोस रे तू कृष्णाला
अक्रुरा जा मथुरेला

****************************

नेऊ नकोस रे तू कृष्णाला
अक्रुरा जा मथुरेला ।। धृ।।

इथे आमचा कृष्ण खेळला
इथेच हाती गिरी तो धरला ।
विसरू कशा त्या लिला ।।१।।

वियोग होता क्षणभर याचा 
कापे थरथर धीर आमुचा ।
सुटतो कंप तनूला ।।२।।

इथे राहू दे नंदकिशोरा
एकटाच तू जा माघारा ।
नको वाढवू व्यथेला ।।३।।

दिपावीण प्रकाश वेगळा
(प्रकाश आणिक दीप वेगळा)
चंदन आणि गंध निराळा ।
नाही दिसला नाही पाहिला ।।४।।

 

 *गीत २३* 
          गोपाल, गोपी, माता, पिता, स्वजन या सर्वांच्या वेदनेला धीर देवून रथ पुढे नेण्यास अक्रुराला कृष्ण सांगतात. कृष्णाचा रथ पूर्णतः नजरेआड होई पावेतो सारे व्रजमंडळ त्या दिशेकडे एकटक लावून पहात होते. रथांच्या चाकांनी उडणारी धुळ रथाला जणू चारही बाजूंनी घेरून रथाला थोपवू पहात होती आणि..... आणि त्या रथाच्या चाकांनी उडणाऱ्या धुळीतच गोप व गोपी कृष्ण सहवासाची, कृष्णस्मृतीची चित्रे पहात होती.

"जा सुखे पण ठेव आठव गोकुळाचा"

**************************

जा सुखे पण ठेव आठव गोकुळाचा
सांगणे एवढेच तूच प्राण आमुचा ।।धृ।।

येईल दाटूनीया रात्र तळमळीची 
होईल चिंब ओली कळी पापण्यांची ।
ही वेदना जिव्हारी-ना अंत:पार त्याचा ।।१।।

आता मनात गाणे गत आठवणींचे
बघणे कोमेजलेले फुलणे फुलांचे ।
उरला हाच आता- अर्थ या जीवनाचा ।।२।।

विपदा धावूनीया आल्या तशाच गेल्या
तुझ्यासवे सुखाने न्हावून रात्री गेल्या ।
आता उदासवाना-रंग वृंदावनाचा ।।३।।

मातीत गोकुळीच्या खेळ खेळलेले
येता मनात सारे-होतील नेत्र ओले ।
तेंव्हा कुणी पुसावा-काठ पापण्यांचा ।।४।।

 

*गीत २४* 
          कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या कृष्णाने कंसवधाचे महत्वाचे कार्य मायाममतेने दूर सरता येत नाही हेच दाखवून दिलं आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत कार्य मोहानेही दूर सारू नका हा सिद्धांत मथुरेला गमन करून कृष्णाने दाखवून दिला आहे. मथुरेत पोहोचल्यावर नगराची शोभा पाहण्यास कृष्ण, बळराम व सर्व गोपगडी पायीच हिंडत होते त्याच वेळी कंसाला अंगराग चंदन अर्पण करण्यास लगबगीने निघालेल्या कुब्जेने कृष्णाला पाहिलं. कृष्णाच्या रूपाच्या मोहिनीने देहभान विसरून कुब्जेने ती चंदनउटी कृष्णालाच अर्पण केली. भगवंताची वस्तू भगवंतालाच अर्पण झाली. म्हणूनच या कर्माचे फळ तात्काळ देण्याचे कृष्णाने ठरविले. एका पायाने कुब्जेची दोन्ही पावले कृष्णाने दाबून धरली. हाताने तिच्या हनुवटीला जोरात वर उचलले. सुंदर रूपाचे दान मिळाल्याने भावविभोर होवून  कुबजा म्हणू लागली -

"अर्पिते तुला सावळ्या घननिळा ।
उटीचंदनी-सुखवी रे कुब्जेला ।।"

****************************

अर्पिते तुला सावळ्या घननिळा ।
उटी चंदनी-सुखवी रे कुब्जेला ।।धृ।।

तुला पाहता मी विसरून गेले
कुठे जायचे अन कुठे चालले ।
म्हणू मोहिनी का तुझीच ही लीला ।।१।।

राजस सेवा घडली आजवर
जसे तसे हे मलिनच अंतर ।
उगा चालले मी पथ चुकलेला ।।२।।

सर्वांगी तव करिन सजावट
म्हणू नको ना मजसी नटखट ।
नको अव्हेरु मी पतीत अबला ।।३।।


*गीत २५* 
          कुब्जेला इच्छित वरदान देण्याआधी कृष्ण बळराम नगरीची शोभा पहात असतांना रंगीबेरंगी कपडे घेवून बसलेला एक धोबी त्याला दिसला. आम्हा सर्वांना ही वस्त्रे दे असे कृष्णाने सांगितले पण त्यावर धोब्याने स्पष्ट नकार देताच त्याचे मस्तक धडावेगळे केले कृष्णाने. थोडे पुढे जात असतांनाच एक शिंपी भेटला. कृष्णाच्या अनुपम सौंदर्यावर मोहित होवून त्याने स्वतःच अनेक उत्तम वस्त्रे कृष्ण, बलराम व त्यांच्या सवंगडयांना दिली. त्यावर प्रसन्न होवून कृष्णाने त्याला या लोकी भरपूर धनसंपत्ती, बल, ऐश्वर्य, भगवंताची स्मृती, दूरवरचे ऐकण्याची व पाहण्याची शक्ती दिली. मृत्यूनंतरही सायुज्य मोक्ष प्रदान केला. भगवंताची वस्तू भगवंतालाच अर्पण करण्यात काय लाभ होतो हे या शिंप्याच्या कथेवरून कळते. पुढे गेल्यावर सुदामा माळी भेटला त्याने अनेक प्रकारच्या सुगंधी फुलांचे हार कृष्ण, बलराम व त्यांच्या सवंगडयांना अर्पण केले तेंव्हा कृष्णाने त्याला अनेक वर देवू केले  पण त्याला नकार देवून सुदामा कृष्णाला म्हणतो, मला काही द्यायचेच असेल तर एवढेच द्या तुमच्या चरणी माझी अविचल भक्ती रहावी. तुझ्या प्रेमी भक्तांच्या बरोबर सदा सर्वदा माझा प्रेमपूर्ण संग घडावा. सर्व प्राणिमात्रांच्या ठायी माझ्या अंतरी दयाभाव निर्माण व्हावा. चित्तशुद्धी झाल्यावरच असं मागणं मागितलं जातं आणि ही चित्तशुद्धी भगवंताची वस्तू भगवंतालाच अर्पण केल्याने झाली आहे हे विसरून चालणार नाही. कृष्णांनी प्रसन्न होवून त्याला हे वर तर दिलेच शिवाय वंशपरंपरा वृध्दिंगत होणारी लक्ष्मी, बल, आयु, किर्ती, कांती यांचं दान दिलं. भक्तांचा असा उद्धार करत करत कृष्ण बलराम यांनी प्रवेश केला तो कंसाच्या रंगशाळेत. तिथलं धनुष्य भंग करून कंसाला आव्हान दिले आणि आखाडयात प्रवेश करणार तोच महाभयंकर कुवलयापीड आडवा आला. आला. त्यालाही यमसदनी पाठवून त्याचा दात उपटून तो खांद्यावर घेतला आणि कंसाच्या आखाड्यात प्रवेश केला . त्यावेळी श्रीकृष्ण पहेलवानांना वज्रकठोर शरीरवाले वाटले, साधारण मनुष्यांना नररत्न तर स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव भासले, गोपांना स्वजन, दुष्ट राजांना दंड देणारा शासक, वृद्धांना शिशु, अज्ञानी जनांना विराट स्वरूप, योगीयांना परमतत्व वाटले. याप्रमाणे आपल्या ऐश्वर्याने कृष्णानी सर्वांना मोहित केले. परंतु कृष्णाची पावले जेंव्हा सिंहासनाजवळ येवू लागली तेंव्हा हाच मनमोहन कृष्ण मात्र कंसाला मात्र -
"भासला काळरुप भासला 
कंस भयभीत झाला "
          उंच मंचावर बसलेला कंस प्राण वाचवण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड, सर्व सर्व फोल ठरले. कृष्णाने कंसाच्या आसनावर उडी मारली. कृष्णाच्या डोळ्यात, मनात, हातात, अंतरात कंसवधाचे स्फुरण प्रवाहित झाले आणि सर्व प्रकारच्या अन्यायाचा, अत्याचाराचा, आधार्मिकतेचा, पापाचा नाश करण्यासाठी कंसाचे केस धरून कृष्णाने कंसाला खाली जमिनीवर फेकले आणि बघता बघता कंसाच्या छातीवर कृष्णाने उडी मारताच कंस गतप्राण झाला. सर्व जगाच्या नियंत्याचीच उडी उरावर पडताच कोण जिवंत राहणार. एका काळ्या भीषणतेचा अंत झाला. अशाही दुष्ट कंसालाही कृष्णानी सद्गतीच दिली कारण वैर भावाने का होईना तो कृष्णाचे ध्यान करीत होता. भीतीनेच कृष्णाचे नाव त्याच्या ओठी येत होते, अंतरी घुमत होते.  कंस वध ही कृष्णाच्या बालपर्वातील महत्वाची घटना. आजच्या आमच्या या कार्यक्रमात आम्ही जी गीते सादर केली ती बालपर्वातील कंस वधापर्यंतची आहेत. गोपालकृष्ण, घनश्याम, नंदनंदन, माधवगोविंद म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता वृंदावनाच्या कणाकणात बहरली, संत जीवनातही ती बहरली. जीवनाची पूर्णता अंतःकरण कृष्णमय होण्यातच आहे हाच संदेश संतांनी दिला, पण हा संदेश देतांनाही त्यांच्या मनात ही जाण होती की,

शब्द संपती, सूर सरती
अमर ही कृष्णगाथा

*****************************

शब्द संपती, सूर सरती
अमर ही कृष्णगाथा ।।
कानी पडता मुखात येता
अंतरी नुरवी व्यथा ।।धृ।।

नाम मधुर ते श्रीकृष्णाचे
धागे विनते मनी भक्तीचे ।
त्या धाग्यावर खुलू लागते
सावळी कृष्णगाथा ।।१।।

रूप सावळे सुंदरतेचे
भान लोपवी तनू मनाचे ।
रोम रोमी गंधित होते
सावळी कृष्णगाथा ।।२।।

शब्दातीत ते रूप सावळे
गोलोकातून भूवरी आले ।
तृप्त न झाले गावून कोणी 
सावळी कृष्णगाथा ।।३।।

bottom of page