top of page

*दासतरंग ३२९*
          
          आपण जागे असतो तोवर घरातील सामान वा येणाऱ्या जाणाऱ्यावर आपले लक्ष असते. जरा कुठे काही आवाज झाला तर कान व मन तिकडे धावते. रात्रीच्या वेळी किंवा बाहेरगावी जाताना मात्र सर्व दारे, खिडक्या बंद करून, कुलुपे लावून जातो. एवढेच नव्हे तर शेजाऱ्यांना सांगून जातो. घराकडे लक्ष ठेवा बर का ? पण ऐवढे करूनही काही वेळेस चोरी होते. चोरीची तक्रार पोलीस ठाण्यावर केली तर त्या यंत्रणेची चक्रे फिरून चोर व चोरीचा माल शोधून काढण्यास हालचाल सुरू होते. अशा प्रकारच्या चोरीची पोलीस ठाण्यावर केलेली तक्रार ही व्यवहारीक, हीच आहे लाभ हानीकारक शरणागती. आमचेकडे चोरी झाली हो कारण आम्ही सर्व दारे उघडी ठेवूनच झोपलो होतो किंवा कुलूपे न लावता बाहेर गावी गेलो होतो आमची तक्रार नोंदवून घ्या तर नोंदवली जाणार नाही. मुर्ख आपणच ठरतो. सद्गुरूंचेकडून प्राप्त झालेला मंत्र व त्या मंत्र जपाने प्राप्त होणारी संपत्ती फार मूल्यवान आहे. तीची उधळपट्टी न करता ती सांभाळायची आहे. जपून ठेवायची आहे. कारण काम, क्रोध, मोह रूपीचोर तिची चोरी करायला टपलेले असतात. म्हणूनच देहरूपी खोलीच्या दारांना खिडक्यांना कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांना कडया कुलूपे लावता आली पाहिजे. ही कडया कुलूपे म्हणजे विवेक आणि अंतर्मुखता हे काहीच न करता काम, क्रोध, मोह रूपी चोरांनी घर फोडल्यावर सद्गुरूंचेकडे तक्रार केल्यावर त्यांनी तुमची तक्रार अर्ज स्वीकारला नाही तर दोष तुमचाच विवेक व अंतर्मुखता यांचा बंदोबस्त असतांनाही एखाद्या प्रबळ प्रारब्ध भोगामुळे हल्ला झाला व त्याची तक्रार सदगुरूंना केल्यावर ते तक्रार स्वीकारून त्या काम, क्रोध, मोह रूपी व पूर्व जन्म कर्म फल रूपी प्रारब्धाला खडसावतात. या माझ्या भक्ताच्या घरात पुन्हा पाय ठेवलात आणि चोरी करायचा प्रयत्न केलात तर जबर शिक्षा होईल. पारमार्थिक व शुध्द प्रेम संपन्न शरणागतीचा हा असा महान लाभ होत असतो.

*दासतरंग ३३०*

          अंगावर स्वच्छ कपडे हवे, चुरगळलेले नकोत. त्यावर चांगला स्प्रे चा फवारा असावा हा माणसाचा सहज स्वभाव. एखाद्याला म्हटले की अहो इतके व्यवस्थीत कशाला वागता तर तो म्हणेल हे पहा मला अजून समाजात चारचौघात रहायचं आहे. याच भौतिक देहच्या आसक्तीमुळे या देहाच्या बाह्यबुध्दीसाठी बाह्यांगाच्या शोभेसाठी आपण सावध असतो व तसे वागत असतो. त्याचबरोबर प्रत्येकाने असा विचारही करावा की माझे अंतःकरण किती मळकट आहे, किती अस्वच्छ आहे. मला स्वत:ला स्वच्छ व शुध्द अंतःकरणानेच समाजात, चार चौघात वावरायचे आहे हा विचार करणेही जरूरीचे.

 

*दासतरंग ३३१*

          प्रवचने ऐकावीत कारण त्यातून मनबुध्दीला काहीतरी बोध मिळून कल्याणाचा मार्ग सापडतो आणि त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा होते. पण पुढे पुढे प्रत्येकानेच स्वतःच प्रवचनकार व्हावे तसा प्रयत्न करावा. प्रवचनकार व्हायचे म्हणजे चार चौघाचे समोर निरूपण करणे नव्हे. श्री तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांची अभंग गाथा घ्यावी. ज्ञानदेवांचा हरीपाठ घ्यावा. रोज दोनच अभंग लक्षपूर्वक व अर्थावर ध्यान देवून वाचावे,मनन करावे, चिंतन करावे. या अभंगातून संतांनी काय सांगितल आहे त्यापैकी आपण आजवर काही केल कां? संतांचा तो उपदेश मलाही जीवनात उतरवता येईल का या प्रकारची अंतःकरणाची लयदारी घडवून त्या प्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे हेच प्रवचन.

 

*दासतरंग ३३२*

          आपण आपल्या नातेवाईकांचे घरी अधून मधून जाणे येणे ठेवतो. त्या योगे संबंध दृढ राहतात, प्रेमाचे राहतात. आपुलकी जिव्हाळा निर्माण होतो. अडीअडचणीला धावून येतात. लौकिक व्यवहार काटेकोरपणे पाळल्याचा हा लाभ. त्याचप्रमाणे संतानी आपल्या तपश्चर्येने पावन केलेली स्थाने किंवा त्याची समाधी स्थाने किंवा त्यांची वस्तीस्थाने या ठिकाणी अधून मधून जाणे येणे ठेवले तर ते सत्पुरूष हयात असो वा नसो त्यांच्या मनात आपल्याबद्दल जिव्हाळा निर्माण होतो आणि तुमचेवर ते अहेतुक प्रेम करून तुम्हाला सांभाळत असतात व संकटकाळी धावून येत असतात.

 

*दासतरंग ३३३*

          साधारणत: चार ते सहा वर्षाची मुले व माणसाचे मन यांची अवस्था ही एकसारखीच असते. चार ते सहा वयाची पोरे एका ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. काहीतरी उद्योग धडपड चालू असते त्यांची. उड्याच मारतील, पाण्यातच खेळतील, तर कात्रीने कागदच फाडत बसतील. बस स्टॉपवर त्यांना घेऊन उभे रहावे तर दगड घेवून बकऱ्या, कुत्र्यांना मारतील. आईवडील दटावतच असतात. अरे किती दंगामस्ती करतो रे! हातपाय मोडला तर याल भोकाड पसरत आमच्याजवळ, जरा शांत तर बसा. माणसाचे मन हे असेच खोडकर असते. एका ठिकाणी स्वस्थ बसणारच नाही. संतरूपी मायबाप अहेतुक प्रेमापोटी त्या मनाला टाहो फोडून सांगत रहातात अरे तुमच्या मनाला जरा स्वस्थ बसायला शिकवा (म्हणजे नामस्मरणात गुंतवा) नाहीतर दुःखाचे आघातांनी भोकाड पसरून बसाल.

 
*दासतरंग ३३४*

          झाडाचे रोप आणून आपल्या घरात हौशीने लावलं, त्याला रोज नियमीतपणे पाणी घातलं तर ती झाडे लवकर वाढतात, बहरतात. त्याला येणारी फुले व फळेही टवटवीत व रसदार. पाण्याच्ये प्रमाण कमी केले तरी झाडे वाढतील पण जलद नाही. त्याला येणारी फुले, फळेही पाहिजे तशी टवटवीत व रसदार राहणार नाहीत. एक ओंजळभरच पाणी घातले त्या रोपांना तर ती रोप मरणार नाहीत, जीवंत राहतील एवढेच. उपासनेचे पाणी ज्या प्रमाणात तुम्ही तुमचे अंतःकरणात नियमाने घालाल त्या प्रमाणे जीवनाचे रोप राहणार आहे.

 

*दासतरंग ३३५*

          आई वडिलांनी बजावले तरी ४ ते १० वर्षाची पोर चाळा करत राहतातच. आई म्हणते लागलं वगैरे तर बसाल भोकाड पसरून. कात्री वगैरे सारख्या वस्तूंशी खेळतांना बोट कापतं रक्त येते. रक्ताची धार पाहून पोर घाबरतं, आणि आई आपल्याला रागवेल हे माहित असून पोरगं आईला हाका मारतं. रक्त पाहून आई प्रथम दोन तीन धपाटे मारते पोराच्या पाठीत आणि लगेच बोटावर हळद वगैरे दाबून ती पोराचं रडणे थांबवते. आपण गुन्हा केला आहे हे पोर जाणत असतं म्हणूनच हळद वगैरे लावण्याचा उपचार चालू असतांना आईच्या धाकाने पोरगा आपले रडणे आतल्या आत दाबून ठेवतो. केवळ देह सुखासाठी धडपडणारी जी माणसे असतात, त्यांना संतमंडळी मधून मधून सूचना देत असतात, भोगांचेबरोबर खेळा पण सांभाळून केव्हा रक्तबंबाळ  करतील सांगता येणार नाही. आघात झाले तर मात्र येवू नका बोंबलत आमच्याकडे भोगाधीन जीव आघातांनी होरपळतो, काही सुचेनासे होते त्याला आणि अखेरीस संताचे कडे तो धावतो. आणि संतही त्याच्या अपराधाकडे काना डोळा करून दुःखाचे शमन होण्याचा त्याला मार्ग दाखवतात.

 

*दासतरंग ३३६*

          सुट्टीचा दिवस आहे. मुलांना खेळायला रान मोकळे होते. आईला सांगून मुले जातात खेळायला बाहेर. आई आतूनच ओरडते 'नीट खेळा रे! मारामारी करू नका. खेळापुढे तुम्हाला कसले भान राहत नाही. काही वेळाने होते भांडाभांडी. एखाद्या पोरावर संगळ्यांचा राग निघून त्याला मारले जाते तो रडून आकांत करतो. तेव्हा त्या पोराची आई आता आपल्याला रागावणार या धाकाने बाकीची सर्व पोरे पळून जातात. आपल्या पोराचा रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई घरातून बाहेर येते. पाहते की आपला पोरगा एकटाच रडत बसला आहे. 'हे काय! तू एकटाच बसलास रडत ? बाकीचे कुठे गेले तुझे मित्र?" "मला मारून सगळे पळून गेले मुलगा रडतच सांगतो. आई चिडून म्हणते 'आता येऊतर दे त्याला पुन्हा खेळायला, चांगली खरडपट्टी काढतेच तरी पण तूच मेला लोचट पुन्हा त्यांच्यातच खेळायला जाशील. आपले धर्म ग्रंथ आपणास सांगतात की संत-सद्गुरू भगवंत हेच तुमचे खरे सोबती आहेत, सोयरे आहेत. ते तुमची साथ कधीच सोडणार नाहीत. पण तुम्ही केवळ आपलाच देह व देहासंबंधी वासना, काम-क्रोध-लोभमोह यांच्यातच खेळून भान विसरू नका. त्यांच्या सहवासात खेळतांना मार बसला तर ते तुम्हाला सोडून पळून जातील वाचवणार नाहीत. त्यांची मदत मिळणार नाही. अशा वेळी संतच पुन्हा जवळ येऊन समजावतील 'अरे बाबा तुला कितीदा सांगितलं की तू या अशाश्वत धोकेबाज मित्रांच्यामध्ये खेळू नको. आता कळलं ना की संकट आल्यावर ते कोणी थांबले का जवळ ? सगळे तर पळून जातात आता तरी शाश्वत हरिनाम शाश्वत संतसमागम या मित्रांचे बरोबर निर्धास्तपणे खेळत जा.

 

*दासतरंग ३३७*

          आपला छोटा मुलगा त्याच्या बरोबरीच्या वयाच्या मुलांचेमध्ये खेळतो आहे. भांडण झाली आणि त्या भांडणात तुमच्या मुलाला त्याच्या मित्राच्या वडिलांनी मारले व आपल्याला ते कळले तर आपला राग अनावर होऊन आपण त्या माणसाला म्हणतो काहो माझ्या मुलाच्या अंगाला हात लावण्याचा तुम्हाला काय अधिकार होता. तोंडाने सांगता येत नव्हते कां ? तुमच्या पोराला आम्ही मारले असते तर मात्र आकाश पातळ एक केलं असतं, संत ज्या माणसाला आपल्या पदरात घेतात त्याला प्रारब्ध भोग मारू लागले आणि त्या मारामुळे त्याच्या सेवा भावात जर व्यत्यय येत असेल तर मात्र संत त्या प्रारब्धालाही दटावतात. खबरदार माझ्या या पोराचे अंगाला पुन्हा हात तर लावून पहा कारण प्रारब्ध संतांच्या आधीन आहे. पदरात घेतलेल्या जीवाचे प्रारब्ध ते बदलू शकतात. संतांनी आपली बाजू ही अशी घ्यावी यासाठीच अखंड हरिनामस्मरणाचा छंद लावून घ्यायचा आहे.

 
*दासतरंग ३३८*

          आपण रस्त्यावरून चालतो आहोत. आपल्याच निष्काळजीपणाने आपण पाय घसरून पडलो तर आपण कोणाला दोष देत नाही. कोणावर तोंडसुख घेत नाहीत, कपडे झटकून पुढे चालू लागतो. पण दुसऱ्या माणसाचा धक्का लागून जर आपण पडलो तर मात्र आपला अहंकार उफाळून येतो. आपण त्या माणसावर हवे तसे तोंडसुख घेतो. तो मनुष्य म्हणत असतो सॉरी हं ! चुकून धक्का लागला. तेव्हा तर आपण आणखीनच चिडून म्हणतो 'धक्का तर मारायचा आणि वर सॉरी म्हणायच' प्रारब्धाचे आधीन मनुष्य जीवन आहे. प्रारब्ध हे सुखरूप-दुःखरूप असते आणि ते प्रत्येकाच्या पूर्वजन्म कर्मफलाप्रमाणे घडत असते. प्रारब्धामुळे आपल्याला एखादा धक्का सुखाचा लागला तर आपण त्याचे श्रेय दुसऱ्याला देत नाही,  कोणावर चिडत नाही. माझ्या प्रयत्नांनी मला हे सुख मिळाले असे आपण प्रौढीने सांगतो. पण प्रारब्धामुळे एखादा धक्का दुःखाचा लागला तर मात्र त्याचे खापर दुसऱ्यांचेवर आणि भगवंतावरही फोडून मोकळे होतो आणि निर्लज्जपणे आपण वर म्हणतो 'एवढे मी चांगले वागतो, देवाचे करतो तर हे दुःख कां ? भगवंतही दयाळू नाही, हे तर अगदीच चूक. प्रारब्धानुसार सुख वा दुःख यापैकी कोणतेही आघात झाले तर ते माझ्याच पूर्वजन्म कर्मफलाचे फळ आहे हे पक्के ध्यानात घ्या. सुखरूप प्रारब्ध निर्माण होईल अशी स्वधर्म संपन्न कर्मे करण्यात तत्पर राहणे हाच खरा पुरुषार्थ.

 

*दासतरंग ३३९*

          देवाची पूजा करायची आहे, उत्तमोत्तम अशी वासाची फुले मिळाली तर आनंद वाटतो पूजा करतांना. फुले भरपूर प्रमाणात असली तर देव्हारा सजवतो, हार करतो काय छान पूजा झाली असा एक प्रसन्न विचार अंत:करणात येतो. हा त्या भरपूर प्रमाणात मिळालेल्या सुवासिक अशा फुलांचा प्रभाव. आपल्याला हीच प्रसन्नता चोवीस तास नव्हे जीवनात अखंडपणे अनुभवयाची असेल तर मन बुद्धि चित्त व अहंकार ही चार तत्वे (म्हणजे अंत:करण) यांचे महत्व जाणून घ्यायला हये, ही चार तत्वे म्हणजे भगवंतानी त्याच्या पुजनासाठी निर्माण केलेली सुवासिक पुष्पे आहेत ती मला सदैव ताजी व टवटवीत ठेवण्यासाठी व त्यांच्याद्वारे भगवंताला व स्वत:लाही प्रसन्न ठेवण्यासाठी मला भगवंत नामस्मरण संतसेवा, स्वधर्म पालन करणे आवश्यक आहे ही जाण सतत ठेवावयास पाहिजे.


*दासतरंग ३४१*

          आपल्या घरच्या देवांची आपण रोज पूजा करतो. पूजा म्हणजे त्या ईशशक्तीबरोबर घडणारा सुख संवाद. त्या शक्तिचे अतिथ्य स्वागत म्हणजे पूजा, आत्मीयतेचा तो प्रेमव्यवहार आहे. पूजा म्हणजे स्वतःच्या व भगवंताच्या प्रसन्नतेसाठी घडणारा भगवंताचा तो सत्कार आहे. हे सर्वप्रथम ध्यानात घेतले की पूजेचा खरा लाभ मिळतो. ज्याला घरच्या देवाची पुजा करतांना हा लाभ घेता येत नाही त्याने बाहेरच्या देवळात दर्शनाचा नेम केला तरी काही फायदा नाही. देवाची पूजा करतांना देवांना स्नान घातले जाते. देवाचे अंग पुसण्याचे वस्त्र कसे आहे यावरही लक्ष ठेवावे. हळदी कुंकवाचे डाग पडलेला कापडाचा एक तुकडा हेच देवाचे वस्त्र अनेक ठिकाणी आढळते. चांगल्या पांढऱ्या शुभ कापडाचे दोन रूमाल शिवावे. रोज साबण लावून स्वच्छ धुवावे देवाचे अंग पुसण्याचे हे रुमाल. आपल्याला स्नान केल्यावर डाग पडलेला मळकट टॉवेल मात्र चालत नाही. देवाला फुले वाहतांना काही फुले बिनवासाची असतात तर काहींना खुपच उग्र वास अशी रानटी फुले. आपण या फुलांचा गुच्छ करून वास घेणार नाही. मग देवांना का बरे ती अर्पण करावी ? देवाची पूजा म्हणजे प्रत्यक्ष देव तेथे आहे ही जाणीव. देवाची आरती म्हणजे त्याचे स्वागत स्त्रोत्रपाठ मंत्र म्हणजे त्यांचे बरोबर संवाद, नैवेद्य म्हणजे भोगासक्ती कमी करण्याचा संकल्प, आपल्या घरी एखादा प्रतिष्ठित माणूस येणार असला तर त्याच्या स्वागतासाठी नुसती अंडरवेअर ,अर्धी चड्डी घालून कोणी जातच नाही. हिंमतच होत नाही. कारण जाणीव आहे की हे स्वागत योग्य नाही. मग देवाची पुजा करतांना मात्र स्नान केल्यावर अंग पुसलेलाच टॉवेल कमरेला गुंडाळून बसणे किंवा अर्धीचड़ी घालूनच बसणे यात त्यादेवतेचा योग्य तो सन्मान नाही हे मात्र कां ध्यानात येत नाही कळतच नाही.

 

*दासतरंग ३४५*

          हल्ली अनेक प्रकारचे डिप्लोमा कोर्स निघाले आहेत. अनेक पॉलीटेक्निकस् ही त्यासाठी अस्तित्वात आहेत. काही खाजगी व काही सरकारी आहेत पण सर्वजण शक्य तो सरकारी शिक्षण संस्थेकडे धाव प्रथम घेतो. कारण अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्या डिप्लोमाला मान्यता व नोकरी याची जास्त खात्री.
          भागवत धर्म, स्वधर्म, संत आज्ञा पालन यांच्या आधारे जीवन जगणे म्हणजे सरकारी मान्यता असलेला अभ्यासक्रम.

 

 *दासतरंग ३४२*

          घरात लग्नाची मुलगी आहे. मुले पहायला सुरवात केली. अनेक ठिकाणी मुलीला दाखवायला न्यावे लागते. प्रत्येक वेळी मुलीला नीट-नेटका पोषाख करावाच लागतो. अनेक ठिकाणाहून पसंतीचा नकार येतो, तरीपण पुन्हा दाखवायचा प्रसंग आला तर मुलीला पुन्हा नीटनेटका पोखाख करावाच लागतो. एका घरचा होकार येतो, आईवडीलांची धावपळ फलद्रुप होते. मुलीच्या नीटनेटकेपणाचे सजण्याधजण्याचे सार्थक होते आणि मग लग्नसोहळा (लग्न म्हणजे समर्पित जीवनाचा पुरुषार्थ संपन्न, सुखसंपन्न, नीतीसंपन्न, धर्मसंपन्न असा आदर्श) संपन्न होई पावेतो तद्नुरुप असा व्यवहार घडतो. आपल्या पसंतीपेक्षा कोणतीही वस्तु, कपडा घेतांना नवऱ्या मुलाकडच्या लोकांच्या पसंतीचाच विचार प्राधान्याने होतो. जेथून होकार आला त्यांच्या प्रसन्नतेसाठी, सन्मानासाठीच हा सर्व व्यवहार स्वभावेच घडतो. माझ्या मुलीचे त्यात कल्याण आहे ही धारणा त्यामागे असते. भक्ती, उपासना, सेवा, परमार्थ यातही हेच घडत असते. मी भगवंताचे खूप करतो, मी भगवंताचा किंवा अमुक सद्गुरूंचा, संतांचा आवडता भक्त आहे असे म्हणण्यात उपासना, सेवा, परमार्थ, यांची सार्थकता नसून  'हा माझा आवडता भक्त आहे, सेवक आहे." असा सद्गुरू, संत वा भगवंत यांनी होकार देण्यातच सेवेची, उपासनेची सार्थकता आहे. हा होकार येई पावेतो मात्र नानाविध रूपाने प्रगटणाऱ्या त्या भगवंत तत्वाला सामोरे जातांना नीटनेटके समजूनच जावे लागत असते, नव्हे जायलाच पाहिजे. हा नीटनेटकेपणा म्हणजे श्रद्धा, विश्वास, प्रेमसंपन्न, स्वधर्मसंपन्न उपासना, सेवा व स्वधर्मपालन. भगवंताकडून, सद्गुरूकडून पसंतीचा होकार येई पावेतो निराशरूपी, अपयश रूप नापसंती पदरात पडली तरी श्रद्धा, विश्वास, प्रेम, स्वधर्म हा नीटनेटकपणा अंगावर घातलाच पाहीजे.

 

*दासतरंग ३४3*

          गर्भश्रीमंत, कर्मश्रीमंत, धर्मश्रीमंत यापैकी कोणती श्रीमंती स्वीकारावयाची याचा विवेक माणसाने करायचा आहे. सर्वांनी शक्य तोवर कर्मश्रीमंतीचाच आग्रह धरणे योग्य कारण ही श्रीमंतीच गर्भश्रीमंती व धर्मश्रीमंती यात परिणाम पावत असते. संतांनी आणखी एक विवेक करण्यास सांगून असे सुचविले आहे की गर्भश्रीमंतीत परिणाम पावणाऱ्या कर्मश्रीमंतीपेक्षा धर्मश्रीमंतीत परिणाम पावणाऱ्या कर्मश्रीमंतीचीच कांस धरा. केवळ पापपुण्याचा विचार करून देहबुद्धीचे रंगात रंगलेला दानधर्म, तीर्थयात्रा, यज्ञ, व्रत, सेवा या कर्मश्रीमंतीचे फळ पुढचा जन्म गर्भश्रीमंत हे आहे. असा माणूस त्याच्या वर्तमान जन्मी धर्माने नीतीने वागणारा दिसला नाही तर तो मनुष्य पहा काहीच देवधर्म करीत नाही. धर्माने, नीतीने वागत नाही तरी श्रीमंतीत लोळतो आहे. आम्ही मात्र इतके करतो देवाचे पण आमची गरीबी कमी होतच नाही. देव न्यायी आहे असे कसे म्हणावे असा घातकी विचार करून शास्त्र, धर्म, संत यांना शिव्या देणे म्हणजे पुन्हा दुःखातच राहणे होय. पुर्व जन्मीच्या कर्मफळानुसार तो या जन्मी खूप श्रीमंत दिसतो आहे. हा कर्मफल सिद्धांत मनुष्याने कधी विसरू नये.असा श्रीमंत मनुष्य वर्तमान जन्मी संतसेवा, उपासना यांनी विरहीत राहील तर त्याच्या श्रीमंतीला ओहोटी आहेच. त्याचा पुढचा जन्मही दुःखभोगात राहणार. भगवंत, संत यांना प्रिय व्हावयाचेच याच निष्कामतेने उपासना, दानधर्म, सेवा, तीर्थयात्रा, नामजप करणारा हा कर्मश्रीमंत' व त्याची कर्मश्रीमंती 'शुचींना श्रीमंता गेहे ' या प्रमाणे धर्मश्रीमंतीत परिणाम पावून तेथेही ती श्रीमंती कर्मश्रीमंतीच्या मार्गानेच चालत राहते.

 

*दासतरंग ३४४*

          शिरा खाल्यावर किंवा लाडू वगैरे सारखा पदार्थ खाल्यावर त्यावर चहा किंवा कॉफी प्यायली तर ती जरा अगोडच लागते. शिरा जास्त गोड म्हणून त्याची गोडी दुसऱ्या गोडीला मारक बाधक होते. लौकिक व कामनीक गोडीची फलश्रुती ही अशी शिऱ्याच्या गोडीप्रमाणे असते. रोजच्या जेवणात पंचपक्वान्ने खावू म्हटले तरी त्याचा वीट येतो त्याच प्रमाणे रोजच्या जेवणात एकच पदार्थ बरेच दिवस खात गेले तरी त्याचा वीट येतो. भाजी चटणी, आमटी भात-कढी एखादा गोड पदार्थ या सर्व पदार्थाच्या आधारे जेवणातील गोडी वाढते. दहा इंद्रियांच्या आधारे प्राप्त होणारी लौकिक, कामनीक गोडी ही अशी अनेकविध वस्तूंचे आश्रयाने घ्यावी लागते व आपण तसा प्रयत्नही करतो. पण अखंड नामस्मरणाच्या छंदाची जी गोडी आहे ती अशी आहे की तीचे रोज सेवन केले तरी कंटाळा येत नाही व इतर कोणत्याही प्रापंचीक गोडीला ती शिऱ्याप्रमाणे मारक व बाधक न होता पूरक व प्रेरकच होते.

 

*दासतरंग ३४६*

          स्वधर्म पालन, सद्गुरू स्मरण चिंतन, सद्गुरु आज्ञेत रममाण होण्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास यालाच म्हणतात पारमार्थिक जीवन, हा जेव्हा एखाद्याचा सहज स्वभाव होतो. तेव्हाच शुद्ध व सत्य सेवाधर्म सुरू होत असतो.

 

 *दासतरंग ३४७*

          एस. टी. ची एखादी बस ही जलद गाडी आहे. तिची थांबण्याची ठिकाणं ठरलेली असतात व तो नियम ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही पाळतात. आपण समजा एखाद्या स्टॉपवर उभे आहोत. त्या ठिकाणी जलद गाड्या थांबत नाहीत. आपल्या समोरून एखादी जलद गाडी जाते. गाडीत जेमतेम सात आठ प्रवासी आहेत. आपण पटकन म्हणतो 'काय हरकत होती येथे गाडी थांबवायला, रिकामीच तर जाते आहे पण नियम म्हणजे नियम. यदाकदाचित त्या जलद गाडीच्या ड्रायव्हर वा कंडक्टरचे लक्ष तुमच्याकडे गेले आणि तुम्ही त्या दोघाचेपैकी कोणाच्या आळखीचे असाल तर स्टॉपचे जरा पुढे जाऊन गांडी थांबते व तुम्हाला खुण करून ड्रायव्हर वा कंडक्टर बोलावतो व गाडीत बसवून घेतो. प्रारब्धाप्रमाणे एखादा भोग सुखाचा तुमच्या जीवनात येणार नसला तरी संत सद्गुरू यांच्या तुम्ही परिचयाचे असला तर ते नियमही बदलून सुखरूप भोगाच्या गाडीत तुम्हाला बसवतात. कारण प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य भगवंतात नसून संताचे मध्ये आहे.

 

*दासतरंग ३४९*

          बसचा प्रवास सुरू आहे. पायाशीच आपली एखादी पेटी वा टिफीनचा डबा आहे. वजनाला हलका आहे. मोटारीचे धक्याने ती पेटी वा डबा सारखा मागेपुढे सरकून खडखडतो आणि प्रवास सुरू असतांनाही आपले सर्व लक्ष त्या पेटीच्या वा डब्याच्या खडखडाटाकडेच वेधते व तो खडखडाट कमी व्हावा म्हणून पेटीवर पाय ठेवून आपण बसतो वा डब्याला एखाद्या दोरीने वा फडक्याने बांधून ठेवतो. बैठकीच्या पायाशी कर्मगतीने देहाचा डबा असा मागेपुढे हलत राहणाराच. उपासना, संतसेवा नामस्मरण यांच्या अभावी तो वजनाला हलका होवून त्याचा खडखडाटही जास्त होईल आणि जीवन जगतांना माणसाचे चित्त त्या खडखडाटाकडे म्हणजे चिंता, काळजी यांचे कडेच लागते. नामस्मरणाचे दोरीने देहाच्या डब्याला बांधून ठेवावे. भगवंत सद्गुरू माझे रक्षक आहेत या विश्वासाचा पाय त्यावर दाबून ठेवा म्हणजे जीवन प्रवास सुखाचा होईल.

 

*दासतरंग ३५०*

          श्रीमंतातील श्रीमंत असे एकच नांव आहे आणि ते म्हणजे सद्गुरू. सद्गुरू आज्ञा पालन हा मार्ग आहे ती श्रीमंती व श्रीमंत कृपा प्राप्त करून घेण्याचा. रूक्षता, संशय, निरूत्साह, विकल्प चंचलता उदासीनता कोणत्याही प्रकारची अंतःकरणात न ठेवता गुरूप्रेम वाढवत जायचे आहे व ते वाढवण्याकडेच लक्ष द्यायचे आहे. वास्तविकतः प्रेमवृद्धी हेच सर्व साधनांचे, साधनेचे सार आहे. याचे स्मरण सर्वदा असावे. मग पापनाश, पुण्यप्राप्ती याच एकदेशीय भाव लहरीत साधना व साधक लीप्त राहत नाही. नको असलेले वृत्ती, दोष, वृत्तीबंध सद्गुरू कृपेने आपोआपच गळून पडतात. हेच सद्गुरू आज्ञा पालनाचे महान फल आहे. जीवनातील सफलता, सार्थकता, उच्चावस्था ही सद्गुरू स्मरण चिंतनात रममाण होऊन व्यवहार रंगवण्यात आहे.


*दासतरंग ३५१*

          आज घरोघरी टी. व्ही. आढळतात. हे निरनिराळ्या कंपन्याचे असतात व त्या प्रत्येकाची किंमत वेगळी, गुणवत्ता वेगळी, आकार वेगळा, रंग वेगळा, नावेही वेगळी (बुश, ओनीडा, वेस्टन, क्राऊन वगैरे) पण या सर्व टी. व्ही. ची अंतरंग रचना व त्या रचनेची व्यवस्था मात्र एकाच तऱ्हेची. एकाच नियमाने बांधलेली असते. मनुष्य म्हणजे एक टी. व्ही. च आहे. गुणकर्म निर्मितीची प्रत्येकाची कंपनी वेगळी म्हणून तो ब्राम्हण, वैश्य क्षत्रिय व क्षुद्र या चार वर्णाने ओळखला जातो. पण या सर्व वर्णाची अंतरंग रचना (अंत:करण रचना, शरीरातील द्रव्ये) व तत्व एकच असते. बाह्यरूप वेगळे राहील (कोणी गोरा, काळा, देखणा, कुरूप, उंच, ठेंगणा, रोड, लट्ठ) बाह्य आकार वेगळा राहील (गरीब, श्रीमंत, नोकर, कारखानदार, मंत्री, पंतप्रधान) हे सर्व असूनही एखाद्या कंपनीचाच टी. व्ही. घेण्याकडे ओढ जास्त असते. याचे कारण त्या टी. व्ही. चे अंतरंगातील मशीनला वापरलेल्या सामानाची गुणवत्ता विशेष असते. त्याचप्रमाणे मनुष्य हा लौकीक दृष्टया श्रेष्ठ कनिष्ठ दिसला तरी त्याची श्रेष्ठता कनिष्ठता त्यांचा अंतरंग रचनेच्या गुणवत्तेवर आहे. एखाद्या कंपनीचा टी. व्ही. बाजारात खूप खपतो म्हणून इतर कंपनीवाले त्या कंपनीला जाळत नाही. त्या कंपनीसमोर निदर्शने करीत नाही. त्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारावर हल्ला करीत नाहीत. उलट आपल्या कंपनीचा टी. व्ही बाजारात जास्त कसा खपेल, आपल्या टी. व्ही. ची गुणवत्ता कशी वाढेल याचा विचार करून तसा प्रयत्न करतात व आपल्या कंपनीच्या मालाचा दर्जा सर्व प्रकारे वाढवतात आणि इतके असले तरी जेथून कार्यक्रम रिले होतात ते स्थान प्रत्येक टी. व्ही. साठी वेगळ्या रंगरूपाचे होत नाही. ते स्थिरच असते. त्यांच्याशी संलग्न राहूनच टी. व्ही. पाहण्याचा आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य वा क्षुद्र यांनी परस्परांचा द्वेष, इर्षा न करता आपापली गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न नामस्मरण, संतसेवा, सद्गुरू कृपा यांनी व भगवंत सर्व समर्थ आहे त्या सत्याशी सतत संलग्न ठेवूनच करायचा आहे. तो केला तर जीवन जगण्याचा त्या जीवनाचा उपभोग घेण्याचा खरा आनंद आहे.

 

*दासतरंग ३५३*

          घरातील पंखा सुरू आहे. घरच्या माणसांना त्याच्या वाऱ्याचे सुख मिळते. पंखा असतांना जे जे तेथे येवून बसतील (मग ती घरातील माणसे असो वा बाहेरची कोणी असो) त्यांनाही त्या वाऱ्याचा आनंद मिळेल. नामधारकाच्या अंतरी अविरत फिरणाऱ्या नामजपाच्या पंख्याचा वारा व त्या वाऱ्याचे सुख कुटूंबियांना व इतरांनाही प्राप्त होत असते.

 

*दासतरंग ३५४*

          नोकरीची जाहिरात आहे, टायपीस्टची जागा आहे. टाईपींगची स्पीड ६० कमीत कमी आहे. तुमची स्पीड ४० ची आहे, तरी पण तुम्ही अर्ज करता. त्यावेळी विचार करता की अजून मुलाखतीला बराच कालावधी आहे. तेव्हा आपण आपली स्पीड ६० पर्यंत वाढवू शकतो. संतांचे कडे गेल्यावर त्यांनी एखादे साधन सांगितले व त्याची स्पीड किती पाहिजे हे सांगितले तर त्याप्रमाणे करणे, स्पीड वाढविणे हेच आपले काम. पण ते न करता आपण लगेच प्रश्न करतो" कमी स्पीड झाली तर चालणार नाही का ? सर्व सांभाळून वेळ मिळाला पाहिजे' हे अगदीच चूक. माझी टाईपींगची स्पीड कमी आहे. इतर व्यापामुळे मला स्पीड वाढविण्यास वेळ मिळणार नाही. हे मात्र आपण ज्या ठिकाणी अर्ज करतो त्या ठिकाणी सांगत नाही कारण जाणीव आहे, आपला अर्ज नामंजूर होणार.

 

*दासतरंग ३५५*

          शर्ट-पॅंट व पायजामा घालतांना हल्ली सर्वत्र आत अंडरवेअर घालण्याची पद्धत आहे. वरचे कपडे घामाने वगैरे खराब होवू नये म्हणून हा  अंडरवेअर. पुष्कळवेळा ही अंडरवेअर व बनीयान अगदी फाटकी सुद्धा असते. कोणाला म्हणावे "अहो वरती चांगले इस्त्रीचे कपडे घालता आहात तर आतली ती अंडरवेअर बदला ना, किती फाटकी आहे बघा. तर तो मनुष्य म्हणेल अहो आत कोण पाहतोय. या कपडयाने तर झाकलीच जाणार. घरी आल्यावर वरचे कपडे काढल्यावर आतील अंडरवेअर वा बनीयान पुन्हा फाटका तर फाटकाच राहतो. तो चांगला होत नाही. या उलट नामस्मरणाच्या गोडीचा, छंदाचा स्वच्छ व इस्त्री केलेला कपडा कितीही दिवस वापरला तरी खराब होत नाही. हा कपडा रोज अंगावर चढवला तर आतल्या अंडरवेअरचा (म्हणजे अंतःकरणाचा) फाटकेपणा मलीनपणा झाकला तर जातोच. एवढेच नाही तर कालांतराने आतील अंतःकरणरूपी अंडरवेअरचा फाटकेपणा, मलीनपणा नाहीसा होऊन ती स्वच्छ टिकावू होते.

 

*दासतरंग ३५६*

          अंतःकरणाच्या दिव्यात जर रोज नेमाने उपासनेचे तेल टाकले तर तेथे जो प्रकाश पडेल तो सुखाचाच समाधानाचाच.

 

*दासतरंग ३५७*

          संवेग तीन प्रकारचे, मृदू मध्य व तीव्र. संवेग म्हणजे अंतःकरणातील भगवंत व सद्गुरू संबंधीचा उत्कट प्रेम सोहळा. जप, मानस पूजा यांच्या माध्यमात अंतःकरण तीव्र संवेगात्म अधिकारी होते.

 

*दासतरंग ३५९*

          भींतीचा पूर्वीचा रंग खरडून टाकला नाही तर वरतून दिल्या जाणाऱ्या रंगांची छटा तिच्या शुद्ध रंगात दिसत नाही. उपासनेचा रंग अंत:करणाला द्यायला सुरवात केल्यावर जोवर आतला पूर्वीचा रंग (विकल्प, संशय, अशुद्धी वगैरे) खरडला जात नाही तोवर उपासनेच्या खऱ्या व शुद्ध रंगाने प्राप्त होणारी प्रसन्नता अनुभवता येणार नाही. उपासनेने आतला पूर्वीचा रंग खरडला जाणार आहे हे ध्यानी घेऊन उपासना सतत चालू ठेवावी.

 

*दासतरंग ३६०*

          दिलीप राजाप्रमाणे सेवा भाव व सद्गुरू आज्ञापालनाची तत्परता ही दोन भूषणेच प्राणपणाने सांभाळण्याचा प्रयत्न करावा. प्रपंच व परमार्थ या दोन्ही क्षेत्रातील सौख्ये हात जोडून समोर उभी राहतात. लीनता साधली जात असते या दोन भूषणांनी. म्हणूनच सर्व वैभव प्राप्त होऊनही माणसाचा विवेक स्थिर राहतो. म्हणून हे वैभव त्याला बाधक न ठरता प्रेरक व तारक होते. परीक्षा तर कोणत्याही जीवनक्षेत्रात होतेच. पूर्वकर्मानुसार आकार घेणाऱ्या प्रारब्धाचे आघात या जन्मी भोगत असताना आपण प्रपंचात कसे वागावे,  अंतःकरणाची प्रसन्नता कशी टिकवतो ही प्रपंच परीक्षा आहे. दम म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चार तत्वरूपी अंतःकरणाची विवेकपूर्ण स्थिरता, प्रसन्नता आणि शम म्हणजे अंत:करणाची विवेकपूर्ण निर्मलता व ईश्वराधीनता ही परमार्थ परीक्षा. या दोन्ही परिक्षेत उत्तीर्ण होण्यासच अखंड नामजप, संतसेवा वगैरेचा अभ्यास. याचक व्हावे परमार्थात आणि मान ताठ ठेऊन प्रपंचात रहावे. याचक म्हणजे दैववाद, दुबळेपणा, भित्रेपणा नाही. शरणागतीचे समर्पणाचे ते सामर्थ्य संपन्न दर्शन आहे. प्रपंच हा उधारीचा न करता चोख, नीटनेटका करणे म्हणजे मान ताठ ठेऊन प्रपंच करणे.

 

 *दासतरंग ३६१*

          प्रासादीक ग्रंथ म्हणजे परावाणीचा चिन्मय सोहळा. त्या सोहळ्याशी प्रापंचिक 'इच्छापूर्तीसाठी एकरूप होऊ म्हटले तर त्या ग्रंथाची ती विटंबनाच त्या चिन्मय सोहळ्याशी तदनुरूप वृत्ती ठेऊनच त्या ग्रंथाचा आश्रय यात त्या परावाणीचा आदर आहे. प्रासादीक ग्रंथ या माझ्या वाङमयीन मूर्तीच आहेत असे भगवंत म्हणतातच तेव्हा संतांनी सांगितलेल्या मार्गानीच त्या मूर्तीचे पूजन घडणे योग्य.

 

 *दासतरंग ३६२*

          संतांचे स्मरण होत राहणे हीच एक प्रबळ आत्मशक्ती आहे. या आत्मशक्तीचे जोरावरच स्मरण करणाऱ्याचे पाठीमागे संताचे आशीर्वाद सहज व नित्य आहेतच.

 

*दासतरंग ३६३*

          सद्गुरू, संत, भगवंत यांना सदैव प्रिय होणाऱ्या अशा वृत्तींनी जीवन विहार नित्य घडणे हीच साधना, असा विहार ज्याच्या जीवनातून सतत घडतो तोच साधक. साधना म्हणजे दोन तीन तासांचा आखीव कार्यक्रम नाही.

 

 *दासतरंग ३६४*

          कोणताही प्रसंग ओढवला तरी चित्ताची प्रसन्नता कायम ठेवणे व सद्गुरू चरणावरील, सद्गुरू वचनावरील प्रेम, श्रद्धा, विश्वास अक्षत राखणे हीच साधकाची सेवामार्गातील श्रेष्ठ पायरी आहे.

 

*दासतरंग ३६४*

          एखादे जरूरीचे काम आहे. ते आपणास करायचे आहे किंवा आपणास कोणीतरी करावयास सांगितले आहे. त्यासाठी सायकल, स्कूटर, लूना ही तिन्ही साधने तुम्हाला दिली आहेत. पायानेच चालत गेले तर कामात उशीर होईल. सायकल वापरली तर कमी उशीर होईल. स्कूटर वापरली तर उशीर होणार नाही. संकटात पडल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी संतांनी साधना सांगितली ती कशी करायची ही ज्याची त्याने ठरवायचे आहे. पायी चालण्याप्रमाणे मंद वेग ठेवला साधनेचा तर लाभ दुरावतो. स्कूटरप्रमाणे वेग ठेवला साधनेचा तर संकट लवकर कमी होईल.

 

 *दासतरंग ३६६*

          बस किंवा रेल्वेने प्रवास करताना रस्त्याचे दोनही बाजूला शेतामध्ये पिकांची रोपे उगवलेली दृष्टीस पडतात. त्या पिकांच्याकडे नुसते वरवर पाहिले तर त्याची लागवड वेडी वाकडी केली आहे असे दिसते. विशिष्ट दिशेने त्याकडे पाहिले असता त्यात एकसूत्रता दिसते. एका रांगेत सर्व पिकांची मांडणी दिसते. या विश्वाकडे नुसते वरवर पाहिले (म्हणजे देहबुद्धीने पाहीले) तर अस्ताव्यस्त दिसेल पण या विश्वाकडे विशिष्ट दृष्टीकोनातून पहिले म्हणजेच ज्ञान दृष्टीने पाहिले तर विश्वरचना सूसुत्र, रेखीव आहे असे दिसते.


*दासतरंग ३६७*

          रंग तयार करण्याचा कारखाना आहे. भिंतीना, मोटारींना व अन्य वस्तूना वापरले जाणारे रंग या कारखान्यात तयार होतात. प्रत्यक्ष रंग तयार होतो तो विभाग वेगळा असतो व त्या कारखान्याचे हेडऑफीस दुसरीकडे असते. दोन्ही ठिकाणी नोकर असतात. नोकरी करणाऱ्याला विचारले तर तो सांगतो अमूक अमूक रंगाच्या कारखान्यात नोकरी करतो. कोणी सांगतो त्या कारखान्याच्या ऑफीस मध्ये काम करतो. प्रत्यक्ष कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या अंगाला, कपड्याला रंगाचे डाग पडतात. ऑफिस मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर, कपड्यावर रंगाचे डाग पडत नाहीत. विशिष्ठ उच्चशिक्षण म्हणून त्यांना ऑफीसमध्ये काम. रंगाच्या कारखान्यात काम करूनही अंगावर रंगाचे शिंतोडे नाहीत. पारमार्थिक प्रपंच म्हणजे रंगाच्या कारखान्यात काम करूनही अंगाला रंगाचा स्पर्श न होणे. प्रापंचिक प्रपंच म्हणजे रंगाच्या कारखान्यात काम करताना अंगाला रंगाचा स्पर्श होणे. पारमार्थिक प्रपंचाचा लाभ प्राप्त करून घेण्याच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य व सामर्थ्य प्रत्येकाला आहे. नामस्मरण, संत सेवा घडली तर अंगाला, चित्ताला विकारांचा रंग लागत नाही.

 

*गुरुपुत्र निर्भय हवा* 

          सद्गुरूंचे कडून मिळालेला मंत्र व या मंत्राचा आश्रय नित्य नेमाने घेणाऱ्या सेवकाने जीवणावरची, प्रयत्नावरची श्रध्दा उडून जाते अशी भीती बाळगणे विसंगतच. वास्तविकत: ही भीती आपणच निर्माण करत असतो. त्याची कारणे आपण कधी शोधून पाहतो का? गुरुपुत्र तर सदा निर्भय पाहिजे, सदा निर्भय असतो.
          घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना, फळप्राप्ती यांचा संबंध आपल्या रोजच्या उपासनेशी जोडून त्यावरून उपासनेची, फळाची श्रेष्ठता-कनिष्ठता, युक्तता, आयुक्तता ठरविली तर ते चूकच. कोणत्याही प्रकारच्या संदेहाला जेथे मुळीच थारा नाही अशा शुद्ध चित्ताचा भगवंत व संत यांच्या नामरूप लीलांचेवर पूर्ण प्रेम विश्वास ठेवून घडणारा तो उत्साहपूर्वक निर्भयपूर्वक कर्मव्यापार म्हणजे उपासना. उपासनेतील सहजता तीच साधना. उपासना व साधना यात मालिनता निर्माण झाली तर तो दोष आपलाच नाही का? निराश न होता घडणाऱ्या घटनांचेकडे अनासक्तीने पाहात पाऊल पुढे टाकणे व उपासनेचे तेज व सातत्य सांभाळत जाणे हाच गुरुपुत्राचा स्वधर्म असून तो त्याने निर्भयतेने पाळला पाहिजे.

 

*दासतरंग ३६८*

          संतांच्या समाधी स्थानावर जाऊन दर्शन घेणे हा प्रत्येकाचा स्वधर्म आहे. मात्र हा स्वधर्म नि:संदेह होऊन पालन करावा. म्हणजे आनंदीआनंदच. निःसंदेहता नसेल तर तो केवळ क्रियात्मक सोहळा घडेल. उदा. शेगावला गजानन महाराजांचे दर्शनाला जायचे ठरविले. तेथे गेल्यावर खूप रांग दिसली तर सर्वसाधारण मनुष्य म्हणतो बापरे! केवढी मोठी रांग ! खूपच वेळ जाणार हा विकल्प अंतरी उठणे हा आहे कोरडा व निष्फळ भक्तिभाव याने जीवनात काहीच लाभ होणार नाही. रांग पाहिल्यावर एकच भाव अंतरी उठला पाहिजे तो असा व्वा! गजानन महाराज, आज मी किती भाग्यवान आहे. आज तुमच्या छायेत मला खूप वेळ उभे रहायला मिळणार आहे. माझे काही पुण्यच उदयाला आले असावे म्हणूनच एवढी मोठी रांग आहे. धन्य धन्य आहे मी! हे खरे दर्शन ही खरी संतदर्शनाची तळमळ पण आपण मात्र रांग पाहून त्रासतो. इतका वेळ म्हणजे पुढच्या गाड्या चुकणार, आखलेला कार्यक्रम चुकणार. आपण शब्दाने भार टाकतो. संतांच्यावर सर्वस्वी भार टाकता आला पाहिजे म्हणजे मग गाड्याही चुकत नाहीत व कार्यक्रमही बिघडत नाही.

bottom of page