top of page
प.पू.श्री आगाशे काकांनी लिहिलेले पद

1.

नित्य सत्य मित । आहार विहार ।
तेची योगसार । जाणावे ।।1।।
विश्रांती पुरता । योग्य तमोगुण ।
परी नागवण । वाढवता ।।2।।
कर्म अनुष्ठानी । शोभे रजोगुण ।
परी गा बंधन । बळावता ।।3।।
प्रेम प्रकाशक । शुद्ध सत्वगुण ।
करावा संपन्न । सर्वकाळ ।।4।।
विश्रांती ती मित । स्वधर्म तो नित ।
नामजप सत्य । सांभाळावा ।।5।।
कृष्णदास म्हणे । श्रीकृष्ण वचन ।
निमित्त होऊन । अभंगी आले ।।6।।

4.

संतांचीये दारी । कशाची ना वाण ।
परी हवी जाण । मागायाची ।।1।।
संतभेट झाली । संसार इच्छीला ।
व्यर्थ व्यर्थ गेला । जन्म त्याचा ।।2।।
संतांचे भेटीत । संतभाव मनी ।
यावा उफाळोनी । मागणे हीत ।।3।।
मूढ कृष्णदासा । देई ऐसी मती ।
संतपदी रती । मागेन मागणे ।।4।।

7.

देहबुद्धी साज । लेवूनी आवडी ।।

विषयांची काडी । नको चघळू मना ।।1।।

विसरून कृष्ण । करीसी संसार ।

केवळ अस्थिर । सुख मिळेल मना ।।2।।

इंद्रियांचा दास । होऊनिया गड्या ।

अशांती फुगड्या । खेळू नको मना ।।3।।

देह सुखासाठी । धावसी तत्परा ।

ऐसा निलाजरा । होऊ नको मना ।।4।।

करी बा सप्रेम । गोपाल सोयरा ।

प्रारब्धाचा दोरा । तुटे अरे मना ।।5।।

कृष्णदास म्हणे । जोडी कृष्ण कृपा ।

चुकतील खेपा । यम यातना ।।6।।

10.

आता धनंजया । सेवेचे विधान ।

ऐक अवधान । देवोनिया ।।1।।

गुरू सर्वकाही । ऐसी मती स्थिर ।

ठेवी निरंतर । तो सेवकीया ।।2।।

सेवेत दुरावा । नको तो क्षणाचा ।

म्हणे मी नभाचा । गवसणीया ।।3।।

गुरू देती साद । प्रेमे ओ देईन ।

दश दिशांतून । जी म्हणोनिया ।।4।।

श्री गुरू घरचा । आठही प्रहरा ।

मी हो म्हणीयारा । आज्ञाधारिया ।।5।।

श्री गुरूंचे डोळे । पाही जो पदार्थ ।

होईन यथार्थ । बहुरूपीया ।।6।।

गुरू चालतील । वाट मी होईन ।

तैसाची तत्क्षण । वाटदाविया ।।7।।

गुरुसी भोजन । सुखे करविन ।

स्वयेची होईन । सुगरणीया ।।8।।

तंतूक मी तंतू । होऊन विणीन ।

गुरूंचे वसन । धवळीया ।।9।।

घालीन गुरुसी । प्रत:काळी स्नान ।

मीच तो होईन । पाणकिया ।।10।।

गुरूंची ती सेज । स्वच्छ सजवीन ।

चरण चुरीन । निरिच्छया ।।11।।

ऐके गा कौंतेया । ऐसी जी अभिन्न ।

सेवा तेच ज्ञान । सुखदानीया ।।12।।

श्रीकृष्ण वचन । करूनी श्रवण ।

झाले सुखपूर्ण । कृष्णदासिया ।।13।।

2.

घडो सुखे प्रपंच धंदा । त्यातच स्मरावे गोविंदा ।
संकल्प विकल्प आपदा । जाती विलया ।।1।।
नानाविध भोग आस्वाद । घेता स्मरावा तो मुकुंद ।
भोगच होई तो प्रसाद । सत्ववृद्धीचा ।।2।।
देता घेतांना नारायण । तेची जाणिजे दान पुण्य ।
पावन होय मन धन । त्याच योगे ।।3।।
गमनागमन समयासी । आठवावे भावे हरिसी ।
तेणे तुटतील आपैसी । वासनाबंध ।।4।।
घास घालता मुखाप्रती । अति प्रेमे म्हणा श्रीपती ।
अन्नच ते यज्ञआहुती । समान होय ।।5।।
त्रिविध तो कर्मव्यापारू । घडेल तो अति सादर ।
अवघ्याचा टाकावा भार । कृष्णपदी ।।6।।
दिवसाकाठी अल्पकाळ । बसावे एकांती निर्मळ ।
सप्रेमे चिंतीता गोपाळ । उखा प्रसन्नतेची ।।7।।
भक्तीचा ऐसा व्यवहारु । प्रेमे करीता अहोरात्रू ।
नुरला भितीचा अंधकारू । कृष्णदास चित्ती ।।8।।

5.

संत चरण गोडी । घेई अरे मना ।
तेणे त्या वासना । होती शुद्ध स्वच्छ ।।1।।
जयाच्या वासना । होती शुद्ध स्वच्छ ।
तोची गा निरिच्छ । जाण अरे मना ।।2।।
सुखाचे ते सुख । निरिच्छ्ते ठायी ।
तीच संत पायी । नित्य रहातसे ।।3।।
कृष्णदास सदा । सांगतसे मना ।
संत लोटांगणा । जाई प्रेमभावे ।।4।।

8.

देहाचिया आत । खेळे जे चैतन्य ।

विश्वाचे पालन । तेची करी ।।1।।

सर्वांठायी एक । परब्रह्म पूर्ण ।

आकार दर्शन । केवळ भिन्न ।।2।।

ऐशापरी नित्य । ठेवोनिया दृष्टी ।

करी जो रहाटी । समता तेथे ।।3।।

तयाचा आचार । विचार ही तैसा ।

होतसे आपैसा । आत्मीय ।।4।।

स्वभावेची मग । तयाचे वागणे ।

सुखाचे पोसणे । होऊ लागे ।।5।।

मग दुरुत्तरे । कशी यावी मुखे ।

नारायण देखे । सर्वात जो ।।6।।

ज्याचा व्यवहार । आत्मबोधे सम ।

तेथे तिष्ठे राम । सर्वकाळ ।।7।।

कृष्णदास म्हणे । समतेची वाट ।

पुण्याईचा थाट । ठायी ठायी ।।8।।

11.

मन आणि बुद्धी । यावरी गा उभा ।

जीवनाचा गाभा । बळकट ।।1।।

जैसे असे मन । तैसेची साकार ।

आचार विचार । घडती ।।2।।

म्हणोनी गा पार्था । संशय सांडूनी ।

माझीया चिंतनी । नित्य रहा ।।3।।

येणेची साधने । होसी मत्परायन ।

देतो माझी आण । तुजलागी ।।4।।

बुद्धीचे वैभव । माझिया दास्यात ।

तेणे सर्व हेत । पुरतील ।।5।।

म्हणोनी ही बुद्धी । निक्षेपी मत्पदी ।

तेणे ती सुबुद्धी । होऊन ठाके ।।6।।

न लागे वेगळे । अहंकारा आमंत्रण ।

जेथे बुद्धी मना । तेथे तो लोळे ।।7।।

मग कैचे भय । कैचे ते संशय ।

अवघे विलय । पावतील ।।8।।

याच देही मग । निर्मल सोज्वळा ।

भक्तिचा जिव्हाळा । उफाळेल ।।9।।

म्हणोनी अर्जुना । सांगतो बा पुन्हा ।

माझिया वचना । दृढ सेवी ।।10।।

कृष्णदास म्हणे । इंद्रिया चोरोनी ।

भगवंत वाणी । ऐकीयेली ।।11।।

3.

नको जाऊ मना । गर्वाचिया वाटे ।
तेणे तुज काटे । सदा रुततील ।।1।।
गर्वाचिये बळे । कुबेर नंदन ।
होती वृक्ष दोन । नंदाचे अंगणी ।।2।।
गर्वाचिये बळे । उग्रसेन सुता ।
प्राणांतीक लाथा । गोविंदाच्या ।।3।।
देहबुद्धीमाजी । गर्वाचा डोलारा ।
फुलवी पिसारा । आत्मघात ।।4।।
कृष्णदास सांगे । मन करा धीट ।
कृष्ण स्मरा दृढ । लोपे देहबुद्धी ।।5।।

6.

लौकिक संगती । लौकीकापूरती ।
संतांची संगती । शाश्वत ।।1।।
दिल्या घेतल्याची । लौकीकाची नाती ।
लाभाविण प्रिती । संतांची ।।2।।
लौकीकाचे देणे । औट घटकेचे ।
देणे ते संतांचे । चिरंजीव ।।3।।
लौकीक विहार । सुख दुःख युक्त ।
नित्य योगमुक्त । संतांचा ।।4।।
लौकीकासी द्यावी । सत्संगाची जोड ।
हाच असे वाड । लाभ एक ।।5।।
कृष्णदास म्हणे । लौकीकी सत्संग  ।
घडता संयोग । परमार्थ ।।6।।

9.

ऐक धनंजया । जैसे पुर्व कर्म ।

तैसा वर्णाश्रम । प्राप्त होय ।।1।।

वर्णाश्रमधर्मी । वर्तणे सप्रेम ।

तयासी स्वधर्म । जाणावे गा ।।2।।

स्वधर्मी वर्तता । लाभ चित्तशुद्धी ।

न राहे अशुद्धी । कुतर्कांची ।।3।।

जलाहूनी दुग्धी । जरी थोर गुण ।

वृक्षासी जीवन । तोयच होय ।।4।।

आपुली जी माता । नसे का सुंदर ।

बालका आधार । तोची सत्य ।।5।।

तैसा तो स्वधर्म । मार्ग कल्याणाचा ।

काया मने वाचा । साधावा सप्रेम ।।6।।

घातले जीवन । झाडाचिये मुळी ।

तेची फुली फळी । बहरा ये ।।7।।

तैसा गा स्वधर्म । आचरता पुर्ण ।

भाग्यासी उधाण । सहज येई ।।8।।

स्वधर्म सोडूनी । भक्तीचे डोहाळे ।

जणू आलिंगले । वांझेच्या पुत्रा ।।9।।

स्वधर्माचा दीप । कृष्णे उजळला ।

प्रकाश पडला । कृष्णदास मनी ।।10।।

12.

माझे हिताहीत । संताचिये हाती ।

ऐसा मनी मती । निश्चय हवा ।।1।।

चिंतन विषय । असावा गोविंद ।

अहंकार शुद्ध । होय तेणे ।।2।।

समर्पण छंद । तोचि जाणावा ।

जेथ नित्य नवा । प्रेमपूर ।।3।।

संयत इंद्रिये । तेची गा जाणावी ।

जेथ धर्म दिवी । प्रकाशमान ।।4।।

संतांना सन्मुख । जाता ऐशापरी ।

तयांचे अंतरी । हरीख दाटे ।।5।।

कृष्णदास म्हणे । संत उपदेश ।

व्यापे सर्वांगास । दृढपणे ।।6।।

  • श्री अरविंद आगाशे काका

-

  • krishnanand saraswati maharaj

-

  • agashe kaka khamgaon

-

  • agashe kaka

-

  • shri arvind agashe

bottom of page