
||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
॥ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ॥
◈ श्रीमार्तंड रक्षा स्तोत्र ◈
श्रीगणेशाय नमः । जय जयाजी उमारमणा । जय जयाजी राधारमणा । जय जयाजी सद्गुरू नाना । नमो नमस्ते ॥१॥ सद्गुरू नाना तुमचे । रक्षास्तोत्र हे साचे । स्मरता कृपाप्रसादाचे । द्यावे अक्षयदान ॥२॥ या स्तोत्राची शक्ती । तुम्हीच सद्गुरुनिश्चिती । तुमचे चरणाची रती । हीच असो फलप्राप्ती ॥३॥ ऐसीया कृपेचे पायस । लाभावे या दासास । याच कारणे स्तोत्रास । जपितो तुम्हा प्रित्यर्थ ॥४॥ वर्णनातीत तुमचे ध्यान । कैसे घडावे शब्दांतून । परी प्रेमादरे करून । स्तवितो अल्पमतीने ॥५॥ ध्यान-शांताकारा गुणीजन प्रिया योगीनाथा परेशा । भक्ताधारा गगन सदृशा गौरवर्णा महेशा । दीनाधारा सुनील नयना भक्त कल्याण दक्षा । ऐसे तुम्हास ध्यातो द्यावे मनोवांछीता ॥६॥ आता माझे मनोरथ । उघड करितो यथार्थ । मी अज्ञ तुम्ही समर्थ । उपेक्षा ना करावी ॥७॥ मन बुद्धि आणि चित्त । तैसा अहंकार अति प्रीत । न राहो कदापी विभक्त । तुमच्या पासोनी ॥८॥ मन माझे सर्वदा । तव चरणी असो सदा । ऐसी दुर्लभ संपदा । मज प्राप्त होवो ॥९॥ श्रेष्ठ सद्गुरू वाचूनी । नाही देव अन्य कोणी । ऐसीया निश्चयापासूनी । न ढळो माझी बुद्धी ॥१०॥ चित्ती सतत चिंतनाचा । विषय तव नीज रूपाचा । जागृत स्वप्न सुषुप्तीचा । हाच असो नाथा ॥११॥ मी सद्गुरूंचे लेकरू । ऐशा छंदाने अहंकारू । होवो तव सेवेचे आवारू । अहोरात्र गुरूराया ॥१२॥ मस्तक माझे सर्वदा लीन रहावे तव पदा । हीच शुद्धपुण्य संपदा । द्यावी मज
मार्तंडनाथा ॥ १३ ॥ माझिया भाल प्रदेशावर । तव पायधुळीचा पवित्र । तिलक शोभावा सुंदर । महायोगीराया ॥ १४ ॥ नेत्रद्वयातील ज्योती । ऐसीच राहे प्रदीप्ती । जेणे नित्य तव मूर्ती । पाहीन लक्ष्मीतनया ॥ १५ ॥ दोन्ही कानांचे महाद्वारी । तव किर्तीची एकतारी । वाजावी नित्य निरंतरी । भक्तवरदा ॥ १६ ॥ माझिया श्वासोश्वासातून । घडो तव पुण्य स्मरण । ऐसा घडो यज्ञ आजन्म । यज्ञप्रिय नाना ॥ १७ ॥ तव नामामताची गोडी । राहावी दोन्ही ओठी । याहून पूर्ण आवडी । नको दुजी यती श्रेष्ठा ॥ १८ ॥ तव चरणाचे तीर्थ । मिळो जिव्हेस प्राशनार्थ । पुरवी हेच मनोरथ । सर्वशक्तीसमन्विता ॥ १९ ॥ हात पायातील बळ । अभंग राहूनी सर्वकाळ । घडो तव सेवा निर्मळ । शंकरसुता ॥ २० ॥ आता व्हावे अधिष्ठित । हृदयसिंहासनी सतत । सांभाळावे माझे हीत । वैराग्यपावका ॥ २१ ॥ देहाचे आतबाहेरी तव कृपेचे कल्याणकारी । राहो कवच ऐसे निर्धारी । जन्मोजन्मी ॥ २२ ॥ कृष्णदासाची आळी । पुरवावी लडीवाळी । मी बाळ तू माऊली । सत्यज्ञानानंत ॥ २३ ॥ तव स्वरूप तत्त्वाचा विचार । आणि महीम्याचा पार । न कळे हे त्रिवार । सत्य असे नाना ॥ २४ ॥ म्हणून सद्गुरूराया । जैसे असेल तैसिया । नमन माझे सदया । प्रेमभावे ॥ २५ ॥ आता द्यावे वरदान । करिता हे स्तोत्र पठण । व्हावी तापत्रय बोळवण । तुमच्या कृपाकटाक्षे ॥ २६ ॥ प्रपंची परमार्थाचा । उजेड पडो पूर्ण साचा । आणि ज्ञान भक्तिचा । मिळो प्रसाद पूर्ण ॥ २७ ॥
॥ श्री मार्तंडरक्षास्तोत्र संपूर्ण ॥