top of page

✺ जय गुरू काका दीनदयाळ 

 

जय गुरू काका दीनदयाळ, भक्तजनांचा करी प्रतिपाळ ।
रूपडे तुमचे बहुत सुंदर । तारून नेते हा भवसागर ।
स्मरता तुजला धावत येशी । भक्तजनांना सुखास देशी ।
काका तुमचे रूपासी ध्याता । आम्हा जाणवे तुमची सत्ता ।
गुरूसेवे तुम्ही झाले दंग । म्हणूनी तुम्हाला नाना संग ।
भाग्यवंता ती कमला माता । जगतासाठी प्रसवे दाता ।
विष्णुपिता हा गुरूरायाचा । दिधला आम्हा निधी तेजाचा ।
वडील बंधूचा पाळुनी धर्म । कर्तव्याचे दावीसी मर्म ।
कंटाळुनीया जग रहाटीला । गिरी कंदरी जाऊन बसला ।
घरी परता आदेश जाहला । दत्तमंत्र तो अंतरी स्फुरला ।
घटना ही चौपन्न सालची । दिशा बदलली आयुष्याची ।
अपार आले प्रसंग असले । गुरूरायाने तारून नेले ।
त्वरीत भेटा आम्हा लागूनी । निरोप नाना देती धाडुनी ।
भेटी घडता पदरी घेवूनी । कृतार्थ केले गुरूरायांनी ।
गुरूसेवा मग कशी असावी । आचरणे ती आणून द्यावी ।
अनेक केली व्रतवैकल्ये । म्हणूनी तुमचे भाग्य सुफळले ।
एकादशीला पंढरपूरीला । तोची नेम मग आळंदीला ।
संतभेटीचा होई हर्ष । आशिष देती संत सहर्ष ।
प्रथम जाऊन पावसग्रामा । वंदीती स्वरूपानंदा प्रेमा ।
खूण शुभांरंभीची दिधली । सोहं गुज ही वार्ता कथिली ।
शक्तीपात आचार्य गुळवणी । देती दीक्षा काकांलागुनी ।
बाळप्पामठी अक्कलकोटी । स्वामी गजानन देती भेटी ।
प्रसन्नचित्ते आशिष देती । प्रकाश आमुचा तुम्हा संगती ।
बाबा महाराज माचणूरवासी । देती आश्रय श्री काकांसी ।
मोह सिद्धीचा पडता चित्ती । संत बापूजी सावध करीती ।
निक्षूनी वदती ते काकांना । कदा न सोडा नाना चरणा ।
दोन तपांची सेवा घडली । नानामय ती वृत्ती जाहली ।
इंद्राहूनी मलकापूरीला । आले काका वास्तव्याला ।

अनेक लोक मार्गी लावले । सकला नानामय ते कले ।
भिन्न प्रदेशी करूनी भ्रमणा । कार्य करीशी अतीव गहना ।
वास जाहला खामगावासी । भक्तजनांची तिथेच काशी ।
ज्ञानदायी ती तुझीच वाणी । भक्तांसाठी अंतर्ज्ञानी ।
नवतरूणांना मार्गी लावीले । नामाचे ते अमृत दिधले ।
तुम्हीच साई तुम्ही गजानन । दिली प्रचिती भक्ता लागून ।
कुणा भक्ताला दिली प्रचिती । तुम्हीच सिद्धारूढ हो निश्चिती ।
वैद्यराज कधी तुम्हीच होता । कृपा औषधी हाता देता ।
स्वये घेवूनी हदय व्याधीला । सुखवी एक गुरूबंधूला ।
हात लागता गाडी धावते । यात्रेमध्ये शांती लाभते ।
स्मर्तृगामी हे काका सद्गुरू । हाक मारीता येती सत्वरू ।
पदतिर्थाचे करीता प्रोक्षण । बहरे लींबाने ते लींबण ।
पर्जन्यावर तुमची सत्ता । वारा थंडी वरती मत्ता ।
कधी भाससी राधेश्याम । कधी भाससी तू रघुराम ।
गावोगावी याग करीवीले । भक्तजनांचे मंगल केले ।
अन्नशांती ही आवड तुमची । प्रतिवर्षाला करीती स्वयेची ।
गाणगापुराला संगमावरती । भीमा अमरजा दर्शन देती ।
काय वर्णू तव अधिकार । भक्तजनांचा तू आधार ।
भजन किर्तनी होई दंग । लावी सकला नाना छंद ।
जगत भासे शून्य तूझ्याविण । शांती लाभते होता पदीलीन ।
षष्ठीस करीता पाठ सहा । कृपा करावी पूर्ण महा ।
सहा पाठ ते सहा गुरूवार । करीता द्यावे सौख्य अपार ।
प्रार्थितसे हा बालक मंद । तव नामाचा लागो छंद ।
साद देता धावूनी यावे । या दासाला तृप्त करावे ।
या दासाला तृप्त करावे । या दासाला तृप्त करावे ।

॥ अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥

bottom of page