top of page

 श्री मार्तंड स्तवन 

आधी वंदन गणेशासी । जो छेदून विघ्नकाननासी । उधळीतसे सुखराशी । कृपाळूपणे ।।१।। तयाच्या स्मरणाचे देणे । संकटाचे नाश पावणे । मनोरथपूर्तीचे लेणे । शोभे अंतर्यामी ।।२।। ऐसा कृपाळू उमानंदन । काया वाया मने ध्याउन । आता स्मरण आवाहन । सरस्वतीचे ।।३।। चारही वाणींची खाणी । हंसारुढ मयूरवाहिनी । तुझ्याच कृपेच्या कोंदणी । सारस्वत ये हाता ।।४।। तुझ्या कृपेच्या भरवसी । गाईन गुरू महिम्यासी । या कारणे आलो पायासी । शरण वागीश्वरी ।।५।। तुझी प्रसन्नता लाभता । तेज येतसे शब्दार्था । अज्ञान हारक सर्वथा । होय भाविकाशी ।।६।। नमन माझे संतजन । भगवंताचे प्रेमभूषण । ज्यांचे साठी ते निर्गुण । आकारासी ये ।।७।। मदभक्त जेणे पुजियेले । अनंत गुणे मज पुजिले । स्वये रघुनाथ बोलले बिभीषणाप्रती ।।८।। केलीया संतांचे स्मरण । तुष्टतसे राधिकारमण । ऐसे सामर्थ्य विलक्षण । संतांचे असे ।।९।। वंदू सद्गुरुचरण । जे पूर्णतेचेही पूर्णपण । जयाचे करवेना वर्णन । अल्पांशाने ।।१०।। म्हणोनिया मौनेची माथा । चरणी झुकवितो नाथा । तुमची संजीवन कथा । वदवून घ्यावी ।।११।। टिटवीने प्यावा आपांपती । तैसीच माझी ही कृती । जाणूनी अगा कृपामुर्ती । क्षमा किजे ।।१२।। ओवाळावे काकडवाती । तया सप्ताश्व रथपती । तैसी ही सलगी निश्चिती । गुरुमाये माझी ।।१३।। जाणूनी मन्मनीचा जिव्हाळा । स्विकारावी सेवा दयाळा । वाढो त्वतकृपेचा जिव्हाळा । मम मनी ।।१४।। आता भाविक जन । विनवतो तुम्हा लागून । होवोनी अति सावधान । चारित्रामृत सेवावे ।।१५।। जाईल मी तू पण आवरण । येईल आनंदा उधाण । अमृताचे अमृतत्व जाण । ते हे लिलामृत ।।१६।। अंतरी गुरुसेवा गोडी । वाहील भरुनी दुथडी । संकल्प विकल्प देशोधडी । होतील क्षणमात्रे ।।१७।। आता होवोनी सावधान । सर्वांगाचे करून कान । सेवावे गुरुगुणगान । प्रेमभावे ।।१८।। तराण्यासी वाघे यांचा । वंश तो वैदर्भ गोत्राचा । त्याकुळी श्री नानांचा । जन्म झाला ।।१९।। धर्मशील सत्कर्मरता । होते शंकरशास्त्री पिता । तैसीच ती लक्ष्मीमाता । पती परायणा ।।२०।। तयांच्या छत्रछायेखाली । नानांची ती जीवनवेली । फळभारे फळास आली । दैवी संपत्तीने ।।२१।। यथाकाळी मौंजीबंधन । होतसे नानांचे संपन्न । गायत्री जप प्रतिदिन । बारा हजार ।।२२।। वर्षे तीन नेम चालला । अंतरी प्रकाश पसरला । गुरुचरणाचा लागला । ध्यास तीव्रतेने ।।२३।। पितृ आज्ञा शिरी धरून । गुरुचरित्र अनुष्ठान । केले नानांनी संपूर्ण । प्रेमोल्हासी ।।२४।। सात पाठांची ती दक्षिणा । घेवून सद्गुरूराणा । कृतार्थ करिती श्री नाना । अनुग्रह देवोनी ।।२५।। गुरू अज्ञाकीत जीवनाचा । जीवनपट असे नानांचा ।बेचाळीस कुळाचा । उद्धारकर्ता ।।२६।। प्रेमछत्र मातापित्यांचे । नेले काळाने कायमचे । तैसेच गृहस्थाश्रमाचे । फिटले ऋण ।।२७।। प्रारब्धाचा खेळ पाहूनी । उद्विग्न न होता मनी । उपासनेची दैनंदीनी । सांभाळीती नाना ।।२८।। प्रत:स्नान भूपाळीचा । सायंकाळी त्या त्रिपदीचा । कधीच नाही चुकायाचा । नेम नानांचा ।।२९।। गीतेचा तो संपूर्ण पाठ । तैसे अनेक पुजापाठ । रघुवंश सर्गाचा पाठ । नित्य घडतसे ।।३०।। येता अतिथी अभ्यागत । उल्हास न मावे मनात । सेवेसाठी अती त्वरित ।।सिद्ध होती नाना ।।३१।। धन्य अवंतीका नगरी । जिथे भक्तराज कैवारी । उमाकांत त्रिपुरारी । भक्तोद्धारा ।।३२।। करिती तेथे गुरुनाना । श्री गायत्री पुरश्चरणा । नित्य पाचशे प्रदक्षिणा । औदुंबरासी ।।३३।। गुरूआज्ञेने तीर्थाटन । करिती नाना संपूर्ण । वर्णन करता ते मौन । येते वाणीला ।।३४।। नर्मदा परिक्रमा जलेरी । करिती नाना निर्धारी । श्री दत्त वैखरी अंतरी । ठेवोनिया ।।३५।। छबडा ग्रामी रामचंद्र । वृंदावनी वृंदावनचंद्र । भेटे काशीपुरी फणींद्र । गिरीणारी अत्रेय ।।३६।। तोषवली आत्रेयमाता । तोषवले संतमहंता । तोषवले श्री गुरुचित्ता । नारीकेल जलाने ।।३७।। मध्यप्रदेशी एक पावन । झरनेश्वर प्राचीन स्थान । जनमेजय कुष्ठ निवारण । घडले जेथे ।।३८।। त्या ग्रामाचा राजा शरण । येवूनी प्रार्थी नाना लागून । लघुरुद्राचे प्रयोजन न्यावे सिद्धीस ।।३९।। तै वेळी लहानशा वाटीत । खवा नानांच्या पुढ्यात । ठेवोनिया - हात जोडीत । बोलला राजा ।।४०।। प्रसाद घ्यावा गुरुवरा । शेष द्यावा तो प्रिती करा । याहूनी नाही लाभ थोरा । इथे समयी ।।४१।। तयेवेळी नाना हसून । स्वहस्ते प्रसाद वितरण । करिती अति आनंदून । ग्रामस्थासी ।।४२।। हजार ओठी खवा गेला । वाटीत तैसाच राहीला । जय नाना जय घोषाला । अवघे करिती ।।४३।। बडवाहचा चमत्कार । नानांनी दाखवला साचार । बुंदी लाडू पाठवा सत्वर । हुकूम तुकोजीरायाचा ।।४४।। श्री नाना प्रार्थीती दत्ता । निश्चल ठेवोनी चित्ता । लाडवांचा पाहता पाहता ढीग पडला ।।४५।। भक्त बाळ गर्दे नावाचा । म्हणे नानास साहेबाचा । हुकूम दौरा करण्याचा । आला असे ।।४६।। भंडाऱ्याचे प्रसादाविन । तुवा नच जावे इथून । नाना सांगती निक्षून । निजभक्ता ।।४७।। ऐकलेना गुरुवचन । दत्तजयंतीस टाळून । पूर्व दिनीच प्रयाण । करीतसे बाळ ।।४८।। आळ अचानक चोरीचा । बाळावरती तो फुकाचा । प्रसाद लाथाबुक्क्यांचा । मिळे त्यासी ।।४९।। गुरुआज्ञेचे पालन । हे सर्व सुखाचे साधन । नातरी ते आवर्तन । होय दुःखाचे ।।५०।। याचसाठी शिष्याने जाण। सांडू नये गुरुवचन । जळोजळो करंटेपण । अधोगामी ।।५१।। श्रीगुरुवचनावरून । करावा जीव लिंबलोन । याहून शिष्याचे लक्षण । नाही दुजे ।।५२।। ढाबला येथील बडाजी । सर्व घेऊन रामचंद्रजी । नानापुढती ठेवती अर्जी । ढाबल्यासी चलावे ।।५३।। महिना होता श्रावणाचा । होकार घेतला नानांचा । लहान बंधुवर श्रावणीचा । भार सोपवला ।।५४।। मुक्कामी पोचताचक्षणी । पुराचे चढले पाणी । कैसी विपरीत करणी । ग्रामवासी कुजबुजती ।।५५।। सर्वज्ञ नानांनी जाणले । दुषण आपणास आले । तडक उठोनिया गेले । नदीकाठी ।।५६।। ओढोनी रेघ नदीतीरी । म्हणती नदीस निर्धारी । जावे परतुनी माघारी । या रेषेमागे।।५७।। क्षणात पाणी ओसरले । पुराचे संकट टाळले । ऐसी सर्वत्र सत्ता चाले । गुरूनानांची ।।५८।। पाल पडता ती दुधात । कापे तारे ताईचे चित्त । स्मरता नानासी । त्वरिता दुध होई निर्विष ।।५९।। तराण्यासी घटना घडली । दत्त पारण्यास आगळी । अशुद्धी पाहुनी अन्नातली । चिंतातुर सारे ।।६०।। पंगत सर्व खोळंबली । गुरुमाय धावुनी आली । दृष्टीक्षेपे सारी निमाली । अशुद्धी ।।६१।। पावन दृष्टी सद्गुरूंची । क्षणमात्रे शुद्धी साची । साऱ्या जीवमात्राची । करिती प्रेमे ।।६२।। 'नाना' शब्द संजीवनी मंत्र । अपवित्रा करी पवित्र । न पाहे पात्र अपात्र । सम सर्वाठायी ।।६३।। जमनाजी गोंडल निवासी । नित्य आळविती कृष्णासी । संतुष्ट होऊनी तीयेसी । देती नाना आशिर्वाद ।।६४।। होईल कृष्णाचे दर्शन । कराल मंदिर निर्माण । त्याची साक्ष उभी अजून । गोंडल ग्रामी ।।६५।। एक स्त्री नागर जातीची । आवड तीज भजनाची । म्हणे विनंती अबलेची । यावे कणारदी ।।६६।। भजन प्रेमी सद्गुरूराणा । संतोष देण्या भक्तजना । निघाला प्रेमे अनवाणा । भक्तांसंगे ।।६७।। मार्गात भजने रंगली । पंधरा मैल वाट सरली । तृप्त करूनी माऊली । परत येती नाना ।।६८।। कोणी एक विधवा वृद्धा । नाना ठायी भाव विशुद्धा । स्वप्नी करूनीया प्रबुद्धा । पुजा गुह्य सांगती ।।६९।। देवपुजा हो देवपुजा । पाय तुझे रे गुरुराया । म्हणावे हे भजन, पुजा । आम्हा पावेल ।।७०।। जयासी म्हणती आपला । त्याचे उद्धारा कळवळा । ठायीठायी प्रगटला । नानाजीवनी ।।७१।। सोडविली पिशाच्च योनी । सोडवले भवबंधनी । लावियले हरिभजनी । बहुत नानांनी ।।७२।। साई रूपे कुणा दिसती । कुणा समर्थ निश्चिती । कुणा नाथासम भासती । शेगावीच्या ।।७३।। अनाथांसी सनाथ केले । अभाग्यासी भाग्य दिधले । दुराचारी यांचे ते केले । चित्त शुद्ध ।।७४।। न घडो कोणाचा मत्सर । हे ब्रिद अतीव तत्पर । सोडोनी भाव आपपर । नाना पाळीती ।।७५।। नानांच्या गुरुभगिनीचा । मुलगा भास्कर नावाचा । हट्ट घेई कलिंगडाचा । आईपाशी ।।७६।। नाही कलिंगडाचे दिवस । कैसा पुरवावा तो मानस । परंतु आपल्या हट्टास । सोडेना भास्कर ।।७७।। क्रोध होवोनी अनावर । माता मारते पाठीवर । धाय मोकलुनी भास्कर । रडू लागला ।।७८।। रडे ऐकले ते नानांनी । धावले बाहेर तत्क्षणी । का मारतेस पोरालागुनी । विचारीती जीजीला ।।७९।। जवळ घेती भास्करासी । क्षणमात्रे कलिंगडासी । निर्माण केले संकल्पेसी । भास्करासाठी ।।८०।। जया वाटे कल्याण व्हावे । तेणे श्रीगुरुसी भाजावे । कायावाचा मने भावे । दास्यत्व करावे ।।८१।। मौनव्रत साधण्यासाठी । एका गावठ्यात नदीकाठी । येवुनी राहती आवडी । सद्गुरू नाना ।।८२।। सुरू जाहले अनुष्ठान । करावे जलाचे प्राशन । करण्या क्षुधा निवारण । खावी कवठे ।।८३।। मौनाचा हा नेम कठीण । अंतरी गुरू साठवून । यथासांग केला संपन्न । श्री नानांनी ।।८४।। नदीकाठी शिवमंदिरी । वस्ती ठेवून अहोरात्री । कधी न ग्रामाभितरी । जाती नाना ।।८५।। रात्री शिवपिंडी शेजारी । नाना झोपती सुखकारी । तेथेच वाघाची स्वारी । तयेवेळी येतसे ।।८६।। पिंडीचे एका बाजूला । झोप घेई तो वाघ रात्रीला । सकाळी सोडुनी स्थानाला । परत जात असे ।।८७।। कुष्मांड नवमी तिथीसी । अवघे तराणावासी । निघती ग्राम प्रदक्षिणेसी । अती उल्हासे ।।८८।। काही भाविकांचे मनी । आली इच्छा प्रगटोनी । अणुनिया नदीचे पाणी । स्नान घालावे नानांना ।।८९।। नानास बसविले शिलेवरी । पाण्याच्या अणुनी घागरी । ओतल्या मस्तकावरी । भरभरुनी ।।९०।। कुणा नाही थंडीचा विचार । नानांवर शितल धार । परी नाना एक चकार । शब्द ना बोलती ।।९१।। धन्य भक्ताधीन नाना । सुखवण्या भक्तजना । शित जलाचा नजराणा । स्विकारीती ।।९२।। आवडी नानास बहुवसी । ग्रंथ असावे संग्रहासी । प्रसंगी हस्तलिखितासी । संपादीती नाना ।।९३।। एकदा कोणी नानास । श्राद्ध विधीच्या पोथीस । न देता झाले उदास । अंतर्यामी ।।९४।। अचानक प्रगटती । वासुदेवानंद सरस्वती । म्हणती प्रेमे नानाप्रती । सोडावी चिंता ।।९५।। आम्ही सांगतो तूम्हासी । लिहून घ्यावे पोथीसी । आनंदूनी पूर्ण मानसी । सिद्ध होती नाना ।।९६।। गुरुमुखीची अक्षरे । लिहिती नाना तत्परे । शिष्योत्तमाचे हेतू अपुरे । रहावे कैसे ।।९७।। सद्गुरु स्वरूप अनंत । सद्गुरू किर्ती अनंत । वर्णावयासी असे सांत । मती माझी ।।९८।। ज्यासी उद्धाराची कळकळ । त्याने होवोनिया विमळ । सेवावे हो अविकळ । गुरुचरण ।।९९।। मातेचा तो कोप दारुणा । पुत्रा कल्याणकारी जाणा । श्रीगुरु क्रोधाचे विंदाना । जाणावे तैसे ।।१००।। सद्गुरूंची प्रसन्नता । राखावी होवोनी अंकीता । मग दुःखाची ती वार्ता । राहील कैसी ।।१०१।। श्री गुरुकृपेचे निधान । ते हे लिलामृत जाण । श्री गुरुसी करुनी अर्पण । होतसे उतराई ।।१०२।। नानासम नाही माऊली । नानासम नाही सावली । नानासम कोण सांभाळी । निजदासा ।।१०३।। कर्ता करविता श्री गुरू । ऐसा करुनिया निर्धारु । वाचता लिलामृत आदरू । लाभ थोर ।।१०४।। नित्य पठणाचा नेम । पुरवील ते सर्व काम । अंतरी सद्गुरू प्रेम । येईल भरुनी ।।१०५।। एकविसाचे आवर्तन । करिता एकविस दिन । तयासी दर्शन देवून । कृतार्थ करतील नाना ।।१०६।। श्री सद्गुरू सेवेविण । न राहो ती कामना अन्य । होईल हा भाव संपन्न । जन्मोजन्मी ।।१०७।। फलप्राप्तीचे हे दान । सफल हो कृपा करून । विनविता तथास्तु वचन । गुरुमाऊली बोलली ।।१०८।। गुरुराया तुमचे गळा । कृष्णदास घालतो ही माळा । याची देही याची डोळा । दावा नीजरूप तुमचे ।।१०९।।

।। इति कृष्णदास विरचित श्री मार्तंड स्तवन संपूर्ण।।

bottom of page