top of page

✺ जय गुरुराज आगाशे काका 

जय गुरुराज आगाशे काका । तुम्हीच हांका जीवन नौका ॥१॥
कृपा करावी ह्या दासावर । तरून जाण्या हा भवसागर ॥२॥
तुम्हा अर्पिता जीवन माला । मोक्ष मुक्ति ही तुमची लीला ॥३॥
सद्गुरू सेवा कशी करावी । तुम्हीच काका ती सांगावी ॥४॥
आचरणातून तुमच्या काका । गुरू भक्तीचा वाजे डंका ॥५॥
सद्गुरू मूर्ती नाना योगी । सिद्ध तपस्वी अन् वितरागी ॥६॥
कठोर सेवा तुमची घेती । कृपादृष्टीचे दान ही देती ॥७॥
प्रसन्न होता सद्गुरू स्वामी । बसे शिष्यची सद्गुरू धामी ॥८॥
म्हणोनी सांगा हेच खरे ना । तुम्हीच काका तुम्हीच नाना ॥९॥
भाग्य आमुचे हेची खरोखर । दर्शन आपुले होई निरंतर ॥१०॥
चरित्र तुमचे गाण्या काका । द्यावी शक्ती अज्ञ बालका ॥११॥
भाग्यवंत त्या कमलाबाई । पुण्यवंत अन् पतिव्रताही ॥१२॥
विष्णुपंत मोरो आगाशे । वकिली मोठी प्रस्थही खाशे ॥१३॥
तीन मुलींच्या जन्मानंतर । पुत्र प्राप्तीला होती आतूर ॥१४॥
आणि खुलले दैवत त्यांचे । भाग्याची फळे जन्मोजन्मीचे ॥१५॥
आषाढमासी शुद्ध षष्ठीला । हिंगणघाटी जन्म घेतला ॥१६॥
नामकरण हा भव्य सोहळा । हर्षे गांवची झाला गोळा ॥१७॥
गोविंद घ्या हो कुणी गोपाळा । देती झोके अरविंदाला ॥१८॥
कुशाग्र म्हणोनी बहु गाजले । वर्धा येथे शिक्षण झाले ॥१९॥
उच्च शिक्षणा सोडून देती । संसाराचा भार झेलती ॥२०॥
मुंबापुरीसी नोकरी केली । पंधरा वर्षे अशीच गेली ॥२१॥
तिथे पाहूनी स्वार्थाची सारा । सर्व जगाचा ये तिटकारा ॥२२॥
नकोच जीवन ऐसे वदती । आत्महत्येला तयार होती ॥२३॥
परंतु अद्भुत झाली वाणी । आज्ञा दिधली तुम्हास कोणी ॥२४॥
तुमची काया अमुची म्हणती । दत्त गुरूचा मंत्र ही देती ॥२५॥
कोण बोलले काही कळेना । परंतु निश्चीत सद्गुरू नाना ॥२६॥
संसाराची सर्व व्यर्थता । क्षणात एका पटली चित्ता ॥२७॥
परमार्थाची लागे गोडी । भगवंताची बहू आवडी ॥२८॥
राम नाम जप एक कोटीचा । छंद लागला हरि नामाचा ॥२९॥
कठोर व्रते अन् उपास नाना । अखंड करता योग साधना ॥३०॥
उपासनेची ऐसी महती । संत मंडळी दर्शन देती ॥३१॥
माचणूरचे बाबा जोशी । काका जाता त्यांचे पाशी ॥३२॥
नवल वर्तले येथे ऐका । प्रसंग घडला मोठा बांका ॥३३॥
ध्यान लावून काका बसता । मांडीवरी ये सर्पदेवता ॥३४॥
काका करिती त्याला वंदन । निघून जावे देवा येथून ॥३५॥

स्वरुप तुमचे अहो विठ्ठला । प्रभो रुचेना हे आम्हाला ॥३६॥
काकांची ही ऐकोनी वाणी । सर्पदेवता जाई निघोनी ॥३७॥
मांत्रिक तांत्रिक गांवी येती । काका त्यांच्या जाळी फसती ॥३८॥
आणि अचानक नाना आले । नाना आले नाना आले ॥३९॥
पत्र धाडूनी सावध करिती । अशी वत्सला श्रीगुरुमूर्ती ॥४०॥
काकांना मग लावूनि हृदयी । दीक्षा दानही तिथेच होई ॥४१॥
"कृष्णदास" हे नांव ठेविले । साधनेस मग स्वतः लावले ॥४२॥
दोन तपांची तपःसाधना । प्रसन्न होती सद्गुरू नाना ॥४३॥
अमोघ शक्ती देवूनी अंती । अधिकारही त्यांना देती ॥४४॥
घेवूनी आज्ञा गुरुरायांची । स्वारी निघाली श्री काकांची ॥४५॥
करोनी नित्यची अशी भ्रमंती । भक्त जनांना देती शांती ॥४६॥
यज्ञा मागोनि करूनी यज्ञा । पावन करती असंख्य अज्ञा ॥४७॥
त्रिपदीचे ते निमीत्त जाणा । किती लाविले नामस्मरणा ॥४८॥
स्वप्नामध्ये जावून काका । दर्शन दिधले तुम्ही अनेका ॥४९॥
बरे आपुले दर्शन कैसे । जशी कल्पना तैसे भासे ॥५०॥
अशी बावनी नित जे गाती । गुरू कृपेची होईल प्राप्ती ॥५१॥
काका तुमच्या कृपादृष्टीनी । पूर्ण होतसे येथ बावनी ॥५२॥
जय गुरुराज आगाशे काका । तुम्हीच हांका जीवन नौका ॥
कृपा करावी ह्या दासावर । तरून जाण्या हा भवसागर ॥ 

॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

bottom of page